बेळगाव लाईव्ह:तब्बल २८ वर्षानंतर बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावची ग्राम दैवत श्री महालक्ष्मीची यात्रा होणार असून सदर यात्रोत्सव पुढील वर्षी एप्रिल- मे 2024 मध्ये करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. सोमवारी गावातील सर्व देवांना गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला.
या गावचा गेल्या वर्ष भरापासून धुमसत असलेला यात्रेचा विषय अखेर संपुष्टात आला. सोमवारी सकाळी गावातील ग्रामस्थ मंडळ यांच्या पुढाकाराने श्री महालक्ष्मी यात्रा 2024 मध्ये करण्याचा ठरण्यात आले. त्यानंतर गावातील मुख्य गल्लीतून वाजत गाजत देव देवतांना धार्मिक विधी व गाऱ्हाणे घालण्यात आले.
मंदिरात सकाळपासूनच ग्रामस्थ जमू लागले होते. मंदिर परिसर भाविकांनी अक्षरश: फुलून गेला होता. या कार्यक्रमानिमित्त गावामध्ये कडक वार पाळण्यात आला होता. त्यानंतर रथ बनविण्यासाठी लागणारे लाकूड , शस्त्र, पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. साधारण दसरा झाल्यानंतर अनेक धार्मिक कार्यक्रामाला सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या एप्रिल – मे महिन्याच्या शेवटच्या किंवा दुसऱ्या आठवड्यात यात्रा होणार आहे.
ग्रामस्थांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून ग्रामस्थ आतापासूनच यात्रेच्या तयारीला लागले आहेत.