बेळगाव लाईव्ह :बेळगावमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून हे अधिवेशन येत्या दि. 4 ते 15 डिसेंबर 2023 या कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या हिवाळी अधिवेशनात प्राधान्याने उत्तर कर्नाटकातील समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान, बेळगावातील हलगा -बस्तवाड येथे 500 कोटी रुपये खर्चून सुवर्ण विधानसौधची निर्मिती करून यावर्षी 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन वैशिष्ट्यपूर्ण होणार असल्याची चर्चा आहे. कांही दिवसापूर्वीपासूनच बेळगावच्या सुवर्ण विधानसौध येथे अधिवेशन भरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी हाती घ्याव्या लागणाऱ्या विविध कामांसाठी, आवश्यक वस्तू आणि साहित्य खरेदीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने निविदा मागविण्यात आल्या आहेत.
यामध्ये स्वच्छतागृहांची कामे, कक्षांवरील नामफलक, खुर्ची, टेबल तसेच अन्य फर्निचर दुरुस्ती, नव्याने खरेदी, पिण्याची पाण्याची व्यवस्था यासह अन्य कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. बेळगावला 12 वर्षांपूर्वी सुवर्ण विधानसौध इमारत झाल्यानंतर उत्तर कर्नाटकातील 14 जिल्ह्यातील नागरिकांनी अक्षरशः जल्लोष केला. मात्र त्यानंतर राज्यात आलेल्या विविध पक्षांच्या सरकारांनी सुवर्णसौधला शक्ती देण्याचे काम केले नाही.
केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचे काम झाले आहे. सुवर्णसौध केवळ शोभेची वस्तू बनली असून या ठिकाणी वर्षातून एकदा हिवाळी अधिवेशन भरवून जणू सरकारी जत्रा भरवण्याचे काम होत असल्याचा आरोप केला जात आहे.