बेळगाव लाईव्ह :नंदगड (ता. खानापूर) नंतर आता बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुकास्तरीय ‘जनता दर्शन’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह अन्य अधिकारी आज सकाळी परिवहन मंडळाच्या बसने बैलहोंगलला रवाना झाले.
बैलहोंगल तालुक्यातील जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी आज सोमवारी ‘जनता दर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांचा ताफा आज सकाळी रवाना झाला.
मात्र या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या सरकारी वाहनांचा वापर न करता राज्य परिवहन मंडळाच्या बसला पसंती दिली. जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी आज सकाळी बसने प्रवास करत बैलहोंगलला गेले.
जिल्हाधिकारी व संबंधित अन्य अधिकारी कांही दिवसांपूर्वी पहिल्यांदा परिवहन बसने प्रवास करत नंदगड (ता. खानापूर) येथील जनता दर्शन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते.
या पद्धतीने जनतेच्या सेवेसाठी सरकारी वाहनांचा वापर न करता जनतेप्रमाणेच सर्वसामान्य रीतीने बसने प्रवास करण्याचा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पाडलेला पायंडा सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.