बेळगाव लाईव्ह :नंदगड (ता. खानापूर) येथे आज खानापूर तालुकास्तरीय ‘जनता दर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जाण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अन्य अधिकाऱ्यांसमवेत चक्क बसमधून तिकीट काढून प्रवास करण्याद्वारे साऱ्यांना धक्का दिला.
बेळगावचे जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील यांनी आपल्या कार्यशैलीमुळे बेळगावच्या जनतेवर एक आगळी छाप पाडली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी पाटील नेहमीच तत्पर असतात.
सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याच्या आपल्या आणखी एका स्वभाव पैलूचे दर्शन घडविताना खानापूर तालुक्यातील नंदगड येथे आज बुधवारी आयोजित जनता दर्शन कार्यक्रमाला जाण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्वतःचे सरकारी वाहन न वापरता परिवहन मंडळाच्या बसचा अवलंब केला.
खानापूर तालुक्यातील जनतेच्या तक्रारी ऐकून स्थानिक पातळीवरच त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी चक्क तिकीट काढून बसमधून निघाले.
यावेळी संबंधित प्रशासकीय व पोलीस अधिकारी देखील त्यांच्यासोबत होते. बेळगाव ते खानापूरच्या प्रवासादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसोबत असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी शक्ती योजनेअंतर्गत मोफत प्रवास केला तर अन्य अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणेच तिकीट काढून प्रवास केला.
बेळगाव व खानापूर येथील बस स्थानकावर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे केलेला हा बस प्रवास कुतूहलाचा विषय झाला होता.