बेळगाव लाईव्ह:बेळगाव विभागाच्या चार बॉक्सर्स अर्थात मुष्टीयोध्यांनी म्हैसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय दसरा मुख्यमंत्री चषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदविताना चार पदके हस्तगत केली आहेत.
म्हैसूर येथे गेल्या 11 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय दसरा मुख्यमंत्री चषक क्रीडा महोत्सव पार पडला.
या महोत्सवातील मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये बेळगाव विभागाचे (बेळगाव, धारवाड, कारवार, विजयपूर व बागलकोट) प्रतिनिधित्व करणाऱ्या युएसएफए बेळगाव केंद्राच्या मुष्टीयोध्यांनी चार रौप्य पदके पटकाविली.
रौप्य पदक विजेत्या मुष्टीयोध्यांमध्ये सृष्टी चन्नबसप्पागोळ (45 -48 किलो महिला गट), अक्कम्मा सावनूर (60 -63.5 किलो महिला गट), सुशील शिल्लेदार (75 -80 किलो पुरुष गट) आणि बद्रुद्दिन दर्गा (86 -92 किलो पुरुष गट) यांचा समावेश आहे.
हे सर्व मुष्टीयोद्धे युएसएफए बेळगाव येथे मुष्टीयुद्धाचा सराव करत असून त्यांना प्रशिक्षक सेन्साई विश्वनाथ चरंतीमठ आणि सेन्साई पुंडलिक खजगोनट्टी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.