बेळगाव लाईव्ह :बेळगाववर विशेष प्रेम असणारे दिवंगत ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. गुरुवर्य बाबामहाराज सातारकर हे वारकरी संप्रदायातील भीष्माचार्य होते, असे बेळगाव वारकरी भाविक सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ.प. शंकर बाळकृष्ण बाबली महाराज यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.
ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांची पिढ्यानपिढ्या वारकरी सांप्रदायामध्ये गेली. बाबा महाराज तीन वेळा बेळगावला येऊन गेले आहेत. बेळगावला आले की ते या ठिकाणी पाच -पाच दिवस आपली पत्नी रुक्मिणी तसेच कन्या, नात, नातू व बहिण असे सहकुटुंब मुक्काम करत. त्यांना बेळगावला आणण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या बेळगावच्या वारकरी संघाला माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खूप मदत केली.
आपण स्थापन केलेल्या बेळगाव वारकरी भाविक सेवा संघाच्या माध्यमातून त्यांचे बेळगावात धर्मवीर संभाजी उद्यानात 6 कार्यक्रम आयोजित केले होते. त्यावेळी त्यांच्या समवेत त्यांची कन्या भगवतीताई व नातू चिन्मय महाराज यांचेही कार्यक्रम झाले. याव्यतिरिक्त गुरुवर्य बाबा महाराज सातारकर यांचे बेळगाव तालुक्यातील कडोली, खडेबाजार येथील नामदेव मंदिर आदी ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम झाले आहेत, अशी माहिती बाबली महाराज यांनी दिली.
ह.भ.प. गुरुवर्य बाबा महाराज सातारकर हे माझ्याशी सातत्याने संपर्कात असायचे. अलीकडेच गेल्या आषाढी वारीमध्ये सासवड मुक्कामी माझी त्यांच्याशी भेट झाली होती. सासवड येथे त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला होता. वय झाले असले तरी बाबा महाराज आजपर्यंत सतत कीर्तन करत होते. त्यांच्या पश्चात आता त्यांचा नातू चिन्मय महाराज आणि कन्या भगवतीताई हे दोघे आपल्या घराण्याची किर्तन आणि प्रवचनाची परंपरा जोपासतील असा आम्हाला विश्वास आहे.
कारण या उभयतांना श्री बाबा महाराज सातारकर यांनी तयार केले आहे. महाराजांच्या पत्नीचे अलीकडेच आठ महिन्यापूर्वी निधन झाले. तत्पूर्वी त्यांच्या मुलाचे कार्यक्रमाच्या ठिकाणी माईक मधील वीज प्रवाहाचा धक्का लागून निधन झाले होते.
विशेष म्हणजे कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी घटनास्थळी आपल्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर देखील विचलित न होता आपल्या अचाट श्रद्धा-भक्तीचे प्रदर्शन घडवताना बाबा महाराज सातारकर यांनी मुलाचे शव सारून ‘श्री राम कृष्ण हरी’ चा गजर करत कीर्तन पुढे सुरू ठेवले आणि कीर्तन पूर्ण झाल्यानंतर आपल्या मुलावर अंतिम संस्कार केले.
इतके प्रचंड त्यागी असणारे श्री बाबा महाराज सातारकर हे संत परंपरेतील महाराज होते. पंढरपूर येथे सोलापूर रस्त्यावर चंद्रभागेच्या तीरावर आणि आळंदी येथे त्यांचे मठ आहेत. आपल्या हयातीत बाबा महाराजांनी नेरूळ मुंबईसह दुधीवरे लोणावळा येथील लोहगडाच्या पायथ्याशी 14 एकर जमिनीमध्ये त्यांनी सुंदर मंदिराची उभारणी केली आहे. बेळगाववर त्यांचे खूप प्रेम होते असे सांगून बेळगाव वारकरी भावीक सेवा संघातर्फे आमची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ह.भ.प. शंकर बाबली महाराज शेवटी म्हणाले.