बेळगाव लाईव्ह :बेळगाव स्मार्ट सिटी योजनेबाबत अनेकांच्या मनात शंका असल्या तरी या प्रकल्पाने राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी छाप पाडली आहे. दहा लाख लोकसंख्येखालील दक्षिण भारतातील सर्वंकष विकास या गटात बेळगावने बाजी मारली आहे. त्यामुळे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याहस्ते इंदोर येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हुबळी-धारवाड आणि शिमोगा या शहरांनीही विविध गटात पुरस्कार मिळवला असून बेळगावला आतापर्यंतचा चौथा पुरस्कार मिळाला आहे.
गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयामध्ये प्रथमच स्मार्ट सिटी प्रकल्पांचे पर्यावरणपूरक सामाजिक प्रशासन या तत्वांवर पुरस्कारांची निवड केली आहे. स्मार्ट सिटी योजनेत 2016 च्या पहिल्या यादीतच बेळगावची निवड करण्यात आली होती. बेळगावसाठी एकूण 930 कोटी मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी 854 कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले. स्मार्ट सिटीने आतापर्यंत 103 कामांसाठी 761 कोटी 21 लाखांचा निधी वापरला आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी योजनेने प्रामुख्याने टिळकवाडी येथील महात्मा फुले उद्यान येथे दिव्यांग मुलांसाठी फिजिओथेरपी केंद्र, रवींद्र कौशिक ई-लायब्ररी, किड्स झोन, उद्यानांचा विकास, कणबर्गी तलाव पुनरुज्जीवन, कमांड आणि कंट्रोल सेंटर आणि रुग्णालये आणि स्मार्ट रस्ते विकसित केले. 211 कोटी 6 लाख रुपये खर्चून सार्वजनिक-खासगी भागीदारी अंतर्गत आणखी सहा कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे या निवडीत पहिल्या क्रमांकाने बाजी मारली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांच्याहस्ते स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक सय्यदा आफ्रिन बानू बळ्ळारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हुबळी-धारवाड स्मार्ट सिटीने खुल्या जागांचे नियोजन, नाला नूतनीकरण आणि ग्रीन कॉरिडॉर विकास या प्रकल्पासाठी नाविन्यपूर्ण कल्पना पुरस्काराच्या श्रेणीत प्रथम पारितोषिक जिंकले आहे. व्यवस्थापकीय संचालक रुद्रेश घाळी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
शिमोगा येथे काँक्रीट फ्लोअरिंग, रस्त्यांवर फूड कोर्ट आणि वाहनतळ यासारख्या नागरी सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुरस्कार देण्यात आला. शिमोगाचे महापौर एस. शिवकुमार आणि स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.