बेळगाव लाईव्ह :संविधानाच्या संकेतानुसार महापौर हे महापालिकेत सर्वश्रेष्ठ असून त्यांच्या विरोधात एका अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीची नोंद घेतली जाते, त्यांचा खच्चीकरण्याचा प्रयत्न केला जातो, हे निषेधार्ह आहे, असे मत सुप्रसिद्ध वकील माजी नगरसेवक ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी व्यक्त केले आहे.
सध्या बेळगाव महापालिकेमध्ये जे रणकंदन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर ते बेळगाव लाईव्हशी बोलत होते. ॲड. अमर येळ्ळूरकर म्हणाले की, महापौर हे महापालिकेत सर्वश्रेष्ठ असल्यामुळे महापौरांच्या माध्यमातून त्यांच्या सल्ल्यानुसार महापालिकेचा कारभार झाला पाहिजे असे घटनेने दिलेले संकेत आहेत. तथापि आज महानगरपालिकेमध्ये चाललेला सावळा गोंधळ पाहिला तर एखादा अधिकारी महापौरांच्या विरोधात तक्रार देतो आणि ती तक्रार नोंद केली जाते. त्या तक्रारीवरून बेळगावच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना नोटीस बजावली जाते हे दुर्दैवी आहे.
या घटनेचा आपण निषेध केला पाहिजे. निषेध यासाठी की राजकीय पक्षांचे पक्षीय राजकारण काहीही असो ते त्यांनी रस्त्यावर करावे अथवा महापालिकेच्या सभागृहात करावे. मात्र हे करताना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून महापौरांचे खच्चीकरण केले जाऊ नये. मी स्वतः बेळगाव महापालिकेमध्ये 5 वर्षे नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यामुळे मला असे वाटते की अधिकाऱ्यांनी जी तक्रार दाखल केली आहे ती चुकीच्या माध्यमातून केली आहे. तेंव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी महापौरांचा मान राखून आपली तक्रार तात्काळ घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे. महापालिकेत एकीकडे सावळा गोंधळ चालू असताना दुसरीकडे अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटक क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष असणारे बेळगाव उत्तरचे माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज एक प्रतिक्रिया देताना यापुढे मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर मराठी माणूस गप्प बसणार नाही, असे म्हंटले आहे.
यावर ॲड. बेनके साहेबांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही गेली 8 वर्षे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष आहात. त्याही पुढे सर्वप्रथम तुम्ही एक मराठी भाषिक आहात. बेळगावच्या मराठी भाषिकांनी तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलेले असताना सध्याच्या महानगरपालिकेच्या कारभारामध्ये तुम्ही मराठी भाषेत संदर्भात काय भूमिका घेतली आहे? ती प्रथम तुम्ही स्पष्ट करावी.
गेल्या 2017 पासून 2022 पर्यंत बेळगाव महापालिकेत प्रशासकीय कारभार होता. त्या काळात राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. थोडक्यात तुम्ही भाजपचे आमदार असल्यामुळे प्रशासकीय कारभार तुमच्या हातात होता. मात्र दुर्दैवाने तुमच्या हातातील या कारभाराच्या माध्यमातून बेळगाव महापालिकेतील सर्व मराठी फलक हटविण्यात आले. तेंव्हापासून आज तेथे फक्त कन्नड व इंग्रजीतील फलक पहावयास मिळतात. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून कार्य करणारे आम्ही कोणत्याही भाषेविरुद्ध नाही. परंतु आमचे म्हणणे इतकेच आहे की भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने देऊ केलेले अधिकार मराठी भाषिकांना मिळालेच पाहिजेत. कारण संविधानाने आम्हाला दिलेला तो अधिकार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की एकेकाळी बेळगाव महापालिकेमध्ये तीन भाषांमध्ये चालणाऱ्या कारभाराला तुमच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये खिळ बसली आणि तेंव्हापासून महापालिकेतून मराठी भाषा हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेंव्हा या संदर्भात तुम्ही आपली भूमिका मांडावी. त्याचप्रमाणे तुमच्या आमदारकीच्या काळात मराठा समाजासाठी तुम्ही कोणते कार्य केले? त्याचप्रमाणे मराठा क्षत्रिय परिषदेचे अध्यक्ष म्हणून या संस्थेसाठी कोणते कार्य केले? हे देखील एकदा स्पष्ट करावे. कारण मराठा क्षत्रिय परिषदेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेले शाहू बोर्डिंगचे काम आजही अर्धवट अवस्थेत पडून आहे
गेल्या दोन महिन्यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या स्वखर्चाने शाहू हॉस्टेल बांधणार आहे असे तुम्ही जाहीर केले होते. आजच्या घडीला त्या हॉस्टेलचा 3 कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार आहे. तेंव्हा माननीय बेनके साहेब उद्या तुम्ही त्या संस्थेच्या बँक अकाउंट मध्ये 3 कोटी रुपये जमा करून शाहू हॉस्टेलचे बांधकाम सुरू करणार आहात का? याचे उत्तरही तुम्ही मराठी भाषिकांना द्यावं. सदर हॉस्टेलमध्ये मराठा समाजाच्या प्रतिभावंत गोरगरीब मुलांची सोय व्हावी ही जी संकल्पना होती ती तुम्ही तुमच्या आमदारकीच्या कारकिर्दीत पूर्ण करू शकला नाही, असे स्पष्ट करून तेंव्हा आता दोन महिन्यापूर्वी दिलेल्या किमान आपल्या आश्वासनाची तरी तुम्ही येत्या 6 महिन्यात पूर्तता करून आपला शब्द पाळावा, असे असे आवाहन ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी बेळगाव उत्तरच्या माजी आमदारांना केले.