Friday, October 18, 2024

/

मलप्रभा नदीच्या उगमस्थानी ‘जागतिक नद्या दिन’ साजरा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सह्याद्रीच्या रांगेतील पश्चिम घाटामध्ये वसलेल्या खानापूर तालुक्यातील निसर्गरम्य कणकुंबी गावामध्ये मलप्रभा नदीच्या उगमस्थानी सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी जगभरात साजरा केला जाणारा ‘जागतिक नद्या दिन’ गेल्या रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘उगम से संगम तक’ या मलप्रभा नदी संरक्षण व संवर्धन अभियानाचा आरंभ करण्यात आला.

स्थानिक निसर्ग -पर्यावरण प्रेमी आणि लेफ्ट. जनरल सरदेशपांडे स्मारक सह्याद्री वनसंरक्षण व अध्ययन केंद्र (सह्याद्री कंझर्व्हेशन इंटरप्रिटेशन सेंटर)उचवडे यांच्या संयुक्त विद्यमाने सदर जागतिक नद्या दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात ग्रामदेवता श्री माऊली देवी मंदिरामध्ये देवीचे दर्शन घेण्याद्वारे झाली. त्यानंतर जल है तो कल है, जल है तो हल है अशा घोषणा देत, नद्यांबद्दल जनजागृती करत रामतीर्थ मंदिर येथील मलप्रभा नदीच्या उगम स्थानापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या ठिकाणी नदीच्या निर्मल धारेसाठी म्हणजे नदी सतत प्रदूषणमुक्त वाहत राहावी यासाठी पूजा विधी करण्यात आला. याप्रसंगी कणकुंबी, चोर्ला, गोवा, महाराष्ट्र, बेळगाव, धारवाड आणि हुबळी येथील पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

पूजा विधीनंतर आयोजित सभेला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा, जल व भू व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) माजी संचालक प्रा. राजेंद्र पोद्दार, सेवानिवृत्त नाविक दल अधिकारी अरविंद शिग्गांव, वाल्मीचे सल्लागार सुरेश कुलकर्णी, घटप्रभा वॉटर युजर्स फेडरेशनचे व्ही. एम. मदनुर, कणकुंबी ग्रामपंचायत अध्यक्षा दीप्ती दिलीप गवस, जीएसएस कॉलेज बेळगावचे माजी प्राचार्य एस. वाय. प्रभू आदी उपस्थित होते.Malprabha

सभेमध्ये मनुष्यासह संपूर्ण नैसर्गिक विश्व कशाप्रकारे नद्यांवर अवलंबून आहे. तसेच पाण्याशी संबंधित आपल्या सर्व गरजांच्या पूर्ततेच्या तुलनेत नैसर्गिक ताज्या पाण्याचा साठा किती कमी आहे, या संदर्भातील विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे नद्यांचे जे प्रदूषण होत आहे त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर देखील चर्चा करण्यात आली. तसेच या समस्यांचे निवारण करण्यासाठी ठोस सातत्यपूर्ण कार्याची गरज व्यक्त करण्यात आली.

यावेळी उपस्थित यांपैकी काही ज्येष्ठ मंडळींनी गेल्या अर्धशतकापूर्वीच्या नद्यांच्या आठवणी सांगितल्या. प्रमुख पाहुणे बेळगावचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा यांच्यासह प्रा. राजेंद्र पोद्दार, अरविंद शिग्गांव, सुरेश कुलकर्णी, व्ही. एम. मदनुर, दीप्ती दिलीप गवस, एस. वाय. प्रभू, किरण गावडे व मुख्याध्यापक सुनील चिगुळकर यांनी समयोचित विचार व्यक्त केले. श्री माऊली देवस्थानाची देखभाल करणारे लक्ष्मण गावडे व राजाराम गावडे यांनी सदर मंदिराचा प्राचीन इतिहास थोडक्यात विषद केला. अश्विन बोरसे व राहुल प्रभू खानोलकर यांनी पर्यावरण संरक्षणासंदर्भात आपण करत असलेल्या कार्याची माहिती दिली. सभेमध्ये कणकुंबी येथील उगमापासून ते कुडल संगम पर्यंतच्या 306 कि.मी. अंतराच्या मलप्रभा नदीच्या खोऱ्याचे ठोस सातत्यपूर्ण संवर्धन करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी निवृत्त प्रा. अंजली चितळे यांनी मलप्रभा नदीवर लिहिलेली आपली कविता सादर केली. त्याचप्रमाणे सांगता सुरेश कुलकर्णी यांनी जल आणि माती यासह मलप्रभा नदीच्या संवर्धनावर लिहिलेल्या कवितेने झाली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.