बेळगाव लाईव्ह:मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी समजावताच अनावधानाने मंडपाच्या ठिकाणी विमल गुटख्याची जाहिरातबाजी करण्याची आपली चूक सुधारत शहरातील संबंधित सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी व्यसनमुक्ती विरोधी विधायक कार्य करण्याचा समंजस निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे गणेश भक्तांमध्ये स्वागत होऊन समाधान व्यक्त केले जात आहे.
महामंडळाने श्री गणेशोत्सव काळात विधायक कार्य करण्याचे आवाहन केले असताना शहरातील बसवान गल्ली, कोनवाळ गल्ली खडेबाजार वगैरे भागातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडपाच्या ठिकाणी तंबाखूजन्य विमल गुटख्याची जाहिरातबाजी करण्यात आली होती. या संदर्भात मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित गणेशोत्सव मंडळांना समजावले असता, चूक लक्षात आलेल्या संबंधित मंडळांनी गुटख्याच्या जाहिरातीचे फलक तात्काळ हटविले. फक्त आपली चूक सुधारून न थांबता महामंडळाच्या आवाहनानुसार या मंडळांनी आपल्या मंडपाच्या ठिकाणी आता व्यसनमुक्ती विरोधी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंदिरं, धार्मिक स्थळांनजीक तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती लावणे हा कोटा कायद्या अंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे संबंधित मंडळांनी श्री गणेश मंडपाच्या ठिकाणी गुटख्याची जाहिरातबाजी केल्याची माहिती मिळताच जागृत झालेल्या महापालिका व पोलीस प्रशासनाने संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी चालवली होती. तथापि गणेश महामंडळाने हस्तक्षेप करून ती कारवाई थांबविली.
आमच्या संबंधित मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते समंजस आहेत. कायद्याविषयीच्या अज्ञानापोटी अनावधानाने त्यांच्या हातून चूक झाल्याचे आणि त्यांनी ती तात्काळ सुधारली असल्याचे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना पटवून दिले.
दरम्यान गुटखा जाहिरातींचे प्रकरण अतिशय कौशल्याने हाताळून संबंधित मंडळांना योग्य मार्गदर्शन करणारे मध्यवर्तीय श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी या पदाधिकाऱ्यांसह घडल्या गोष्टीचा बाऊ न करता समंजसपणे वागून सहकार्याची भूमिका घेणारी संबंधित सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळे सर्वांच्या अभिनंदनास पात्र ठरली आहेत.