Friday, May 17, 2024

/

विजयनगर येथील ‘या’ समस्येकडे हेस्कॉमने लक्ष देण्याची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :विजयनगर, हिंडलगा येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. गोरल यांच्या इमारती समोरील धोकादायक जुन्या इलेक्ट्रिक खांब आणि विजेच्या तारांमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्याचप्रमाणे या खांबावरून देण्यात आलेल्या इलेक्ट्रिक कनेक्शनचा गैरवापरही होत असल्यामुळे हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित खांब व विजेच्या तारा तात्काळ हटवाव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

फर्स्ट स्टॉप विजयनगर, हिंडलगा येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. गोरल यांच्या इमारती समोरील इलेक्ट्रिक खांब आणि विजेच्या तारा दिवसेंदिवस धोकादायक बनत चालल्या आहेत.कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकणाऱ्या आपल्या इमारती समोरील धोकादायक इलेक्ट्रिक खांब आणि विजेच्या तारा हटवाव्यात अशी मागणी डॉ. आर. एस. गोरल हे गेल्या 8 वर्षापासून वारंवार करत आहेत.

 belgaum

यासंदर्भात हेस्कॉमच्या सेक्शन अधिकाऱ्यांना निवेदनं देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. डॉ. गोरल यांच्या घरासमोर म्हणजे इमारती समोर कमी दाबाच्या विजेच्या तारांचे दोन खांब आहेत. डॉ. गोरल यांनी आपल्या घरासाठी भूमिगत विजेचे कनेक्शन घेतले असल्यामुळे विजेच्या खांबांची त्यांचा काही संबंध येत नाही.

मात्र त्यांच्या घराच्या आवारातून प्रवेश मार्गावरून लोबकळणाऱ्या विजेच्या तारा गेल्या आहेत. या तारा खालून ये -जा करणारे लोक आणि वाहनांसाठी धोकादायक ठरत आहेत. या खेरीज विजेच्या तारा सैल झाल्यामुळे इलेक्ट्रिक खांबांपैकी एक खांब डॉ. गोरले यांच्या इमारतीच्या बाजूला कलला आहे. यात भर म्हणजे झाडाच्या तुटून पडणाऱ्या छोट्या फांद्यामुळे एकमेकांना स्पर्शून सदर विजेच्या तारांमधून ठिणग्या उडत असतात. या धोकादायक विजेच्या तारा अथवा कललेला इलेक्ट्रिक खांब अचानक एखाद्या वाहना अथवा व्यक्तीवर कोसळल्यास मोठा अनर्थ घडू शकतो.Hescom

अशा धोकादायक परिस्थितीबरोबरच विजेच्या जिवंत तारा इमारती जवळून आवारातून गेल्या असल्यामुळे डॉ. आर. एस. गोरल यांना परवानगी असूनही आपल्या इमारतीचे पुढील बांधकाम करणे अशक्य झाले आहे. खाली लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा आणि कललेला धोकादायक अवस्थेतील इलेक्ट्रिकचा खांब यामुळे डॉ. गोरल आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वतःच्या घरात शांतपणे सुखाने राहणे ऐवजी सतत दडपणाखाली राहावे लागत आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार डॉ. गोरल यांच्या शेजाऱ्याला कृषी वापरासाठी म्हणून संबंधित खांबावरून विजेचे कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात त्या शेजाऱ्याची त्या ठिकाणी कोणतीच शेतजमीन नाही. तेथील पूर्वीच्या शेत जमिनीची एनए लेआउटद्वारे भूखंड करून केंव्हाच विक्री करण्यात आली आहे. कृषी वापराच्या नावाखाली शेजाऱ्याकडून इलेक्ट्रिक खांब उभारून देण्यात येत असलेल्या विजेचा वापर घरगुती उद्देशासाठी केला जात आहे. या पद्धतीने गेल्या 25 वर्षांपेक्षा अधिक काळापासून सदर शेजारी मोफत मिळालेल्या वीज कनेक्शनचा गैरवापर करत आहे.

यासंदर्भात डॉ. आर. एस. गुरुराज हे गेल्या 8 वर्षापासून सातत्याने आवाज उठवत आहेत. तरी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित इलेक्ट्रिक खांब आणि विजेच्या तारा तात्काळ हटवाव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.