बेळगाव लाईव्ह:तुर्केवाडी व शिनोळी (ता. चंदगड), यळेबैल (ता. बेळगाव) आणि बेलूर (ता. खानापूर) येथील वारकरी तसेच त्यांच्यासोबत असलेले शिक्षक, केमिस्ट आणि शेतकरी बंधूंनी जीवनातला पहिला विमानप्रवास केला हे आपण यापूर्वी वाचलेच आहे. पंढरीची पायी वारी करणाऱ्या वारकरी मंडळींनी हा प्रवास करतानाच उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश राज्यातील पवित्र तीर्थ स्थळांचे दर्शन घेतले आहे.
वाराणसी, अयोध्या, प्रयागराज आणि चित्रकूट आदी ठिकाणांचे दर्शन घेऊन ते सुखरूप परतले. पंढरीनाथाचे भक्त… श्रीराम – विश्वनाथाच्या दर्शनाने तृप्त असेच या सहलीचे वर्णन करता येईल.
तुर्केवाडी गावातील ब्रह्मलिंग मंदिरात भजन पूजा आणि इतर विधी करून या वारकऱ्यांना गावकऱ्यांनी निरोप दिला होता. यानंतर गोवा येथील मोपा एअरपोर्ट मध्ये दाखल होऊन हे वारकरी अडीच तासांचा विमान प्रवास करून थेट वाराणसीत पोहोचले. वाराणसी येथे रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी श्री राम जन्मभूमी अयोध्येचे दर्शन या वारकऱ्यांनी घेतले. श्रीराम जन्मभूमीत 30 ते 35 टक्के पूर्णत्वाला आलेले मंदिर आणि राम लल्ला चे दर्शन घेतल्यानंतर एकच जयघोष त्यांनी सुरू केला होता. दुसऱ्या दिवशी आयोध्येतून प्रयाण करून गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेल्या प्रयागराज येथे प्रयागस्नान करण्यात आले.
अनेकांनी वेणीदान सारख्या धार्मिक विधी केल्या. त्या दिवशीचा मुक्काम प्रयागराज येथे होता. तीसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान श्रीरामांनी ज्या ठिकाणी वनवास भोगला त्या चित्रकुट पर्वताचा आनंद लुटण्यासाठी वारकरी रवाना झाले. चित्रकुट पर्वतावर राम आणि भरताचा मिलाफ झालेले ठिकाण, रामाने आपले वडील दशरथाना केलेले पिंडदानाचे ठिकाण, सीतामाईच्या पायाशी लोळण घालण्यासाठी प्रकट झालेल्या गोदावरी नदीचे पात्र अशी ऐतिहासिक ठिकाणे पाहून पुन्हा प्रयागराज ला मुक्काम करण्यात आला. प्रयागराज येथून वाराणसी कडचा प्रवास सुरू झाला.
वाराणसी येथे दाखल झाल्यानंतर सायंकाळी गंगेची आरती आणि होडीतून फिरून वेगवेगळ्या घाटांचे दर्शन घेण्यात आले.
शेवटच्या दिवशी पहाटे काशी विश्वेश्वर यांचे दर्शन आणि त्यानंतर तेथील अनेक स्थळे पाहून परतीचा प्रवास सुरू झाला. सहलीचे संयोजन करणाऱ्या पृथ्वीराज टूर्सने सहलीत कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत याची काळजी घेतली होती. सहलीतील सर्व सदस्य पन्नास वर्षाच्या पुढचे होते. महत्त्वाचे म्हणजे 75 वर्षांच्या सदस्यांचाही यामध्ये सहभाग होता. त्यांच्या आहाराची काळजी म्हणून खास स्वयंपाकी अर्थात ‘महाराजाची’ सोय करण्यात आली होती. रोज पहाटे लवकर उठणाऱ्या मंडळींना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असा सकस आहार देण्यात येत होता. परतीच्या प्रवासात आलेली अडचण निवारण्यासाठी पृथ्वीराज टूर्सने मोठी भूमिका बजावली.
तांत्रिक अडचणीमुळे वाराणसी ते गोवा हा विमान प्रवास रद्द झाला होता. त्यावेळी विमान कंपनीशी चर्चा करून वाराणसी ते हैदराबाद मार्गे गोवा अशी विमान प्रवासाची सोय करण्यात आली आणि त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी इंडिगो एअरलाइन च्या माध्यमातून भोजनाची सोय करण्यात आली. अशा पद्धतीने ही आनंदी वातावरणात झाली. रक्षाबंधनाच्या दिवशी आपापल्या बहिणीला भेटण्याची ओढ सर्वच सहलीतील मंडळींना लागून राहिली होती. त्यामुळे विमान प्रवास लांबला असला तरी दोन ऐवजी तीन विमानात बसून परतलेल्या वारकऱ्यांनी आपापल्या गावात गेल्यानंतर रक्षाबंधनाचाही आनंद लुटला आणि पृथ्वीराज टूर्सला वेळेत पोचवल्याबद्दल धन्यवाद दिले.
बेळगाव येथील पृथ्वीराज टूर्सने त्यांच्या या प्रवासाची उत्तम सोय केल्याबद्दल अनेकजण आभार मानत आहेत. सहल संयोजक गोपाळ ओऊळकर आणि तूर्केवाडी गावचे सरपंच रुद्रप्पा तेली यांच्या नेतृत्वाखाली ही सहल आयोजित करण्यात आली होती. बेळगावच्या नामवंत प्रतिक टूर्स चे मालक प्रतिक प्रेमानंद गुरव यांनी यामध्ये विशेष सहकार्य दिले.एकूण सहा दिवसांची ही सहल अनुभवून ही मंडळी तृप्त झाली आहेत.
शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला आणि सर्वसामान्य वर्गासाठी कमी खर्चात दर्जेदार सहली आयोजित करण्याचा वसा पृथ्वीराज टूर्स ने घेतला आहे. दरम्यान या वर्गातील व्यक्तींनी सहली आयोजित करण्यासाठी 96860 84656, 8748855575, 8073324496 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.