टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिज (आरओबी) खालील रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवरील निर्बंधासाठी उभारलेल्या लोखंडी कमानीच्या ठिकाणी एक कंटेनर अडकून पडल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे घडली. यामुळे कंटेनरसह कमानीचे नुकसान झाले आहे.
तिसऱ्या रेल्वे गेट आरओबी खालील रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आला आहे. अवजड वाहनांना रोखण्यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी कमानी उभारण्यात आल्या आहेत.
तथापि आज शुक्रवारी पहाटे एका मालवाहू कंटेनर चालकाने यापैकी एका कमानी खालून आपला कंटेनर पुढे दामटण्याचा प्रयत्न केला. त्याचे पर्यवसान कंटेनर कमानीमध्ये अडकून त्याच्या टपाचे नुकसान होण्यामध्ये झाले. त्याचप्रमाणे लोखंडी कमान एका बाजूने जमिनीतून नटबोल्टसह उचकटल्यामुळे तिचेही नुकसान झाले आहे.
रस्त्यावरील लोखंडी कमानीमध्ये अडकून पडलेल्या कंटेनरमुळे या मार्गावरील रहदारीस कांही काळ अडथळा निर्माण झाला होता.
घटनास्थळी दाखल झालेल्या रहदारी पोलिसांनी संबंधित कंटेनर चालकावर गुन्हा नोंदविल्याचे समजते.