बेळगाव लाईव्ह:स्वच्छतेबाबत कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी टेंडर बोलावण्यात आले तरी देखील आरोग्य स्थायी समितीला विश्वासात न घेतल्याचा आरोप करत स्थायी समिती बैठकीत सदस्य आक्रमक झाले होते. शुक्रवारी बेळगाव महापालिकेत बैठक झाली.
आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणार्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत आपल्याला माहिती देण्यात आलेली नाही. 26 लाख रूपयांची निविदा काढण्यात आली. तरी सदस्यांना विश्वासात घेण्यात आले नाही, असा आरोप करत या प्रकाराविरोधात धरणे आंदोलनाचाही इशारा दिला.
या बैठकीत महापालिकेकडून कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी 26 लाख रूपयांची निविदा काढण्यात आली आहे. पण, त्यासाठी आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप अध्यक्ष रवी धोत्रे यांनी केला. आम्हाला किंमत देत नसाल तर धरणे आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर त्यांची समजूत काढण्यात आली.
नगरसेवकांना अभ्यास दौर्यासाठी इंदोर किंवा विजयवाडा या ठिकाणी नेण्यात येणार आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे ठरले. यावेळी काही जण सफाई कर्मचारी नियुक्तीवरून महापालिकेला बदनाम करत असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी, विरोधी गटनेते मुजम्मील डोणी, सदस्य श्रेयस नाकाडी, आदी उपस्थित होते.आरपीडी कॉर्नर, नरगुंदकर भावे चौक, रविवारपेठ आणि आरटीओ सर्कल या ठिकाणी स्वच्छतागृहांचा निर्णय झाला. बैठकांना अनेक अधिकारी अनुपस्थित राहतात. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्याची सूचना करण्यात आली.