बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सव हा मराठी माणसाचा मोठा सण! मांगल्याचं प्रतीक!! बुद्धी देवता प्रत्येकाच्या घरात एक दीड दिवस ते अकरा दिवस वास्तव्यास येते आणि त्या कुटुंबाला आनंदाचा स्पर्श होतो. गेली कित्येक वर्ष हा गणेशोत्सव आनंदाने उत्साहाने मांगल्याने आणि विधायकतेने साजरा करण्याचा प्रयत्न अनेक जण करतात, करत आले आहेत.
परंतु मधल्या काही काळात या गणेशोत्सवाला गालबोट लावण्याचे प्रकार काही गणेश भक्तांकडूनच घडले. खरं म्हणजे ही बुद्धीची देवता घरात, आपल्या गल्लीत, वाड्या वस्तीवर येते ते म्हणजे एक मांगल्याचे प्रतिक आहे. चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला तर एक आगळवेगळे वातावरण घरात निर्माण होतं.
अबालवृद्धांनाआवडणारा गणेश ज्यावेळी आपल्या घरी येतो त्यावेळी एक वेगळी अनुभूती आपल्याला जाणवत राहते , स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला हा गणेशोत्सव आता अधिक विधायकतेकडे नेण्याची गरज निर्माण झालीआहे.लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी लोकांना एकत्र आणून संघर्षाला धार देण्यासाठी गणेशोत्सवाचा वापर केला. आता परिस्थिती बदलली आहेत आता गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक कामाची जाणीव असणे गरजेचे आहे .गणेशोत्सव साजरा करताना काय काय करू शकतो याची जनतेला जाण देऊ शकतो .उदाहरणार्थ आता लोकसंख्या वाढल्यामुळे गणेश मूर्ती आणताना मोठ्या प्रमाणात गर्दी होते यावेळी फटाकड्यांच्या माळा लावताना अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते,अशा प्रसंगी आवश्यक तेवढीच आतशबाजी करावी ,त्याचबरोबर पारंपारिक वाद्य वाजवून मंगलमय वातावरण निर्माण कराव तरच हा सण आनंदाई होऊ शकतो .
सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी अनेक गोष्टी आपण करू शकतो शास्त्रीय संगीत, कथाकथन व काव्यवाचन त्याचबरोबर विविध कला दर्शन अशा पद्धतीचे कार्यक्रम ठेवून गणेश ही बुद्धीदेवता आहे याचं मार्मिक दर्शन आपण लोकांफुढे ठेवू शकतो. अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं हे महत्त्वाचं साधन ठरू शकतं. अशा अनेक मार्गाने हा गणेशोत्सव विधायकतेकडे आपण नेऊ शकतो.
आज काल लोकांचा लोकांशी -घराघरांचा संबंध तुटत चालला आहे, या पार्श्वभूमीवर मुलांना एकमेकांच्या घरात आरती म्हणायला पाठवून एक सामाजिक संवादतेचे वातावरण तयार करून आपण एक भावबंधनाचे पर्व निर्माणकरू शकतो. पूर्वीच्या काळी गल्लीगल्लीत मुलं एकमेकांच्या घरी जाऊन आरत्या म्हणायची प्रसाद घ्यायची सामूहिक खेळ खेळायची त्याचबरोबर देखावे पाहण्यासाठी एकत्र फिरायचेआणि एक उत्साही वातावरण निर्माण व्हायचे ते वातावरण परत निर्माण करण्याची गरज आहे.
पर्यावरण पूरक गणपती आणून आपल्या देशाचा पर्यावरणाचा तोल आपण ढळू देता कामा नये त्याचबरोबर फटाकडे वाजवणे डॉल्बी सारखे वाद्य वाजवणे त्याचबरोबर आपल्या गणेशाच्या पुढे दिवस हिडीस नृत्य करणे हे प्रकार टाळले पाहिजेत अनेक गोष्टी आहेत की ज्या गणेशोत्सवात आपण लोकांच्या पुढे कला रूपाने सादर करू शकतो. शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवू शकतो, त्याचबरोबर पुस्तकांचा पमेला बरवू शकतो .अनेक शास्त्रीय उपकरणे आहेत त्यांचे ज्ञान लोकांना देऊ शकतो.अशा पद्धतीने अनेक मार्गाने आपला गणेशोत्सव… बुद्धी देवतेचा उत्सव लोकां समोर सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून विधायकतेकडे नेता येऊ शकतो.
गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जनता रस्त्यावर आलेली असते अनेक चित्ररथाच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळ देखावे सादर करत असतात. या देखाव्यातून सामाजिक प्रबोधन करणे त्याचबरोबर आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे हे सहज शक्य आहे. ज्यावेळी गणेश मंडळाचे चित्ररथ रस्त्यावर येतात त्यावेळी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने यावे. त्यावरचा जो संदेश आहे तो शांतपणे लोकांच्या पर्यंत पोहोचवावा. त्यात देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने, देशाच्या आघाडीच्या दृष्टिकोनातून सध्याची देशाची स्थिती कशी चांगली आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून देशाने केलेल्या प्रगतीचे अनेक पैलू दाखवून त्याचबरोबर कोणत्या क्षेत्रात आपण आपली बाजी मारू शकतो ,कोणत्या क्षेत्रात आपल्याला संधी आहे अशा पद्धतीचे चित्ररथ सादर करून लोकांचे त्या माध्यमातून प्रबोधन करणे शक्य आहे.
गणपती हा आमचा परंपरागत सण आहे या उत्सवात ज्या काही गोष्टी होतात त्या शास्त्रोक्त व्हाव्यात. गणेशाचे आगमन करणे त्याचबरोबर गणेशाचे विसर्जन करणे हे वेळेत झालं पाहिजे .शास्त्रानुसार झाले पाहिजे कारण कोणतीही गोष्ट जर आपण धार्मिक करत असू तर त्याबरोबर शास्त्र पाळणे गरजेचे असतं ,आणि जर आपण शास्त्र पाळू शकत नसेल तर त्या गोष्टीमुळे आपल्याला स्वतःला शिस्त लागणे अशक्य होतं. शिस्तबद्ध रित्या आणि शिस्तीत आणि वेळेत गणेशोत्सव पार पाडणे हे आमच्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे आणि आमचा समाज कसा सुसंस्कृत आहे, आमचे उत्सव हे आमच्या संस्कृतीचे प्रतीक आहेत हे जगाला दाखवण्याचा हा मार्ग आहे ,आणि हा मार्ग चोखाळताना आम्ही प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक नेमस्त पद्धतीने आणि आपल्याला सांगितलेल्या शास्त्रानुसार आपल्या रूढी परंपरांना ग्राह्य मानून केल्या पाहिजेत.
या उत्सवाच्या माध्यमातून पुढच्या पिढीसाठी एक चांगला संदेश देणे गरजेचे आहे. हे संस्कृतीचे संक्रमण पुढच्या पिढीच्या हातात देताना ते विधायक झालं पाहिजे केवळ एकमेकांच्या अंगावर गुलाल उधळत विक्षिप्त हावभाव करणे ही आपली संस्कृती नव्हे. अश्या गोष्टी टाळून आमच्या सणाचे महत्व घरात समाजात आणि एकंदर लोकांच्या मनात भिनवलं पाहिजे. भक्तीरस ,भक्तीभाव, श्रद्धा हे अशा सणांचं मूळ असतं आणि या मुळाला धक्का लावला तर आमच्या संस्कृतीचा वेल कोमेजून जाईल आणि हे टाळणं खूप गरजेचे आहे.
गणेशोत्सव काळात विविध स्पर्धा भरवणे ,रक्तदान शिबीर यांचे आयोजन करणे, मिळालेल्या देणगीचा सदुपयोग करून गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे.
या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षात विशेष प्रगती केली त्यांना शालेय वस्तूंच्या रूपाने बक्षीस वाटता येतील. काही आपल्या समाज घटकात अशी लोक आहेत की ज्यांचा मुख्य प्रवाहात अजून प्रवेश झाला नाही अजून झाला नाही अशा घटकांना या उत्सवात सामील करून त्यांना मदत करता येईल. त्याचबरोबर दुष्काळा सारखी परिस्थिती आहे त्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन ,त्यांच्या घरी जाऊन त्यांना काही मदत देऊन या उत्सवाचा आनंद त्यांना मिळावा अशी व्यवस्था करणे अशा अनेक बाबी आहेत की ज्या आपण सहजासहजी करू शकतो त्याचबरोबर सामाजिक जाणवेच्या भावनेतून वृक्षारोपण करणे वेगवेगळे उपक्रम राबवणे त्याचबरोबर आपल्या परिसरात काही अश्या जागा आहेत का ज्या अस्वच्छ आहेत त्या स्वच्छ करणे.
एक संघटित ताकद या गणेशोत्सवाच्या माध्यमातून उभी राहते त्या माध्यमातून विविध खेळांना प्रोत्साहन देणे परिसरात असणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहनरूपी मदत करणे त्याचबरोबर जे कलाकार असतील साहित्यिक असतील त्यांना मदत देणे अशा पद्धतीचा एक आगळावेगळा उपक्रमही आपण राबवू शकतो विचार करताना अनेक गोष्टी आपल्याला सुचत जातात नवनाविण्याची आमच्याकडे अजिबातच कमतरता नाही या माध्यमातून आपण अनेक गोष्टी अशा करू शकतो की ज्यायोगे हा गणेशोत्सव विधायक तर होईलच पण आनंद उत्सव ही होईल. आणि परत एकदा आम्ही मराठी माणसं एका चांगल्या सणाच्या माध्यमातून एक वेगळं रूप जगापुढे मांडण्यात यशस्वी होऊ.