सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना विविध प्रकारची परवानगी देण्यासाठी शहरातील आठ पोलीस ठाण्याच्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या सिंगल विंडो अर्थात ‘एक खिडकी’ सुविधांच्या ठिकाणी भेट देऊन मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज तेथील कामकाजाची पाहणी केली तसेच कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
येत्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या टिळकवाडी पोलीस ठाणे, मार्केट पोलीस ठाणे, खडेबाजार पोलीस ठाणे, उद्यमबाग पोलीस ठाणे, कॅम्प पोलीस ठाणे, माळमारुती पोलीस ठाणे, शहापूर पोलीस ठाणे आणि एपीएमसी पोलीस ठाणे या ठिकाणी एक खिडकी सुविधा सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी शहरातील सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळांना आवश्यक पोलीस प्रशासन, अग्निशमन, हेस्कॉम व महापालिकेकडून देण्यात येणारी परवानगी मिळण्याची सोय एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गेल्या शुक्रवारपासून सुरू झालेल्या या एक खिडकी सुविधेचे काम सुसूत्रपणे सुरू आहे की नाही? या सुविधेचा लाभ मंडळांना व्यवस्थित मिळतो की नाही? कांही तक्रार, समस्या तर नाही ना? याची शहानिशा करण्यासाठी आज सोमवारी सकाळी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष माजी नगरसेवक सतीश गोरगोंडा, संयुक्त सचिव विजय चौगुले, सचिन केकरे, वृषभ वरूर व रोहन जाधव यांनी खडेबाजार पोलीस ठाणेसह शहरातील संबंधित अन्य पोलीस ठाण्यांचा दौरा करून तेथील ‘एक खिडकी’ सुविधेच्या कामकाजाची पाहणी केली. त्यावेळी सर्व ठिकाणी गणेशोत्सव मंडळांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पोलीस प्रशासन, अग्निशमन, हेस्कॉम व महापालिका यांची परवानगी त्वरेने उपलब्ध करून दिली जात असल्याचे पाहून महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले.
त्याचप्रमाणे विविध परवानग्या घेण्यास आलेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी देखील आवश्यक परवानग्या आपल्याला त्वरेने उपलब्ध केल्या जात असल्याचे सांगून समाधान व्यक्त केल्याचे विकास कलघटगी यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले. त्याचप्रमाणे एक खिडकी सुविधाच्या सर्व ठिकाणी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अमित हळदणकर, श्रीकांत पाटील वगैरे पदाधिकारी, सदस्य मोफत सेवा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
या खेरीज सदर ‘एक खिडकी’ सुविधा येत्या 17 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असली तरी शेवटपर्यंत न थांबता शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी या सुविधेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा, असे आवाहनही जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी केले.