बेळगाव लाईव्ह:गेल्या दहा दिवसांपूर्वी शिवबसवनगर येथील स्पंदन हॉस्पिटलनजीक निर्घृण हत्या झालेल्या नागराज गाडीवड्डर या युवकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मारेकऱ्यांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी रामनगर, वड्डरवाडी येथील रहिवाशांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.
रामनगर, वड्डरवाडी येथील नागराज इराप्पा गाडीवड्डर (वय 26) या युवकाचा गेल्या 30 ऑगस्ट 2023 रोजी रात्री फरशीच्या तुकड्याने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी सदर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी रामनगर, वड्डरवाडी येथील रहिवाशांनी आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान जोरदार निदर्शने करून मयत नागराजला न्याय द्यावा, मारेकऱ्यांना कठोर शासन करावे अशी मागणी केली जात होती.
मोर्चामध्ये मयत नागराज गाडीवड्डर याच्या आई-वडिलांसह वड्डरवाडी येथील येथील युवक आणि रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोर्चाची सांगता झाली. त्या ठिकाणी नागराज गाडीवड्डर या युवकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांची बोलताना रामनगर, वड्डरवाडी येथील एक रहिवासी म्हणाला की, शहर परिसरात घडणाऱ्या युवकांच्या खुनांच्या बाबतीत पोलीस अधिकाऱ्यांची विफलता दिसून येत आहे. अलीकडेच वड्डर समाजातील नागराज गाडीवड्डर या दिवसभर गवंडी काम करून पोट भरणाऱ्या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. आपल्या तरण्याताठ्या कमावत्या मुलाच्या हत्त्येमुळे त्याच्या आई-वडिलांवर आभाळ कोसळले आहे. त्यामुळे आमची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी आहे की या खून प्रकरणाच्या मागे ज्यांचा हात आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा नागराजाच्या खुनाला पोलीस प्रशासनच जबाबदार आहे असे समजले जाईल. फक्त नागराज गाडीवड्डरचा प्रश्न नाही तर गेल्या सहा महिने वर्षभरात बेळगाव शहर परिसरात अनेक युवकांचा निष्कारण कोणतीही चूक नसताना खून झाला आहे.
त्यामुळे आमची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी नागराजच्या खून प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधाराला गजाआड करण्याद्वारे त्याला कठोर शासन होईल अशी व्यवस्था करावी. कारण खून झालेल्याची पार्श्वभूमी गरीबीची असेल तर संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. त्यामुळे मारेकरी मोकाट सुटतात. त्याकरताच आमची वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे. त्यांनी खुनांच्या वाढत्या घटनांना आळा घालून बेळगावमध्ये शांतता निर्माण करावी, असे त्या रहिवाशाने सांगितले.