बेळगाव लाईव्ह -175 वर्षाची परंपरा असलेल्या आणि साहित्यिक क्षेत्रात बेळगावचा मानबिंदू ठरलेल्या येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सातव्या संगीत भजन स्पर्धेला आज सायंकाळी मराठा मंदिरच्या सभागृहात प्रारंभ झाला.
ह भ प मषणू माळी यांनी दीप प्रज्वलन करून आणि संत नामदेव, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या स्पर्धांना प्रारंभ केला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष माजी महापौर गोविंदराव राऊत हे होते. त्यांनी सर्वांचे स्वागत करून माळी यांचा सन्मान केला.
सहकार्यवाह डॉ. विनोद गायकवाड यांनी प्रास्ताविक केले .उपाध्यक्ष अनंत लाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर संचालक नेताजी जाधव यांनी आभार मानले. व्यासपीठावर सचिव सुनिता मोहिते व सौ.अंजना राऊत या उपस्थित होत्या. सुरुवातीला बापट गल्ली येथील उत्कर्ष महिला भजनी मंडळ यांनी दिंडीच्या रूपात प्रवेश केला आणि एक सुंदर भजन सादर केले.
आज एकंदर चार भजनी मंडळानी आपल्या कला सादर केल्या. या स्पर्धेत बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर तालुका आणि चंदगड तालुका अशा विभागातून 41 भजनी मंडळ भाग घेतला असून त्यामध्ये वीस महिला भजनी मंडळे तर 21 पुरुष भजनी मंडळे आहेत.
पुढील चार दिवस रोज दुपारी तीन नंतर या स्पर्धांना मराठा मंदिराच्या सभागृहात प्रारंभ होणार आहे. वाचनालयाचे सर्व संचालक आणि विविध भागातून आलेले रसिक याप्रसंगी उपस्थित होते