बेळगाव लाईव्ह:रस्त्याची अनावश्यक खुदाई टाळून जलवाहिनीला लागलेली गळती, ब्लॉकेज, दूषित पाणी पुरवठा अशा समस्यांचा शोध घेण्यासाठी बेळगाव शहरांमध्ये यापुढे ‘रोबो टेक्नॉलॉजी’चा वापर केला जाणार आहे. या पद्धतीने संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच बेळगाव शहरात हा प्रयोग केला जात आहे.
विशेष कॅमेरा असणारा हा ‘रोबो’ नादुरुस्त किंवा दूषित पाणीपुरवठा होत असणाऱ्या जलवाहिनीत सोडण्यात आल्यानंतर तो सुमारे 1 कि.मी. अंतरापर्यंत जलवाहिनीला कोणत्या ठिकाणी ब्लॉकेज किंवा गळती लागली आहे? कोणत्या स्थळावर दूषित पाणी मिसळत आहे? याचा शोध घेऊन त्याची माहिती कंट्रोल रूमला पुरवणार आहे.
या आधुनिक नव्या तंत्रज्ञानामुळे जलवाहिनी दुरुस्तीसाठी रस्त्याची खोदाई करण्याचे काम वाचणार आहे. तसेच जलवाहिनीतील दोष आणि अन्य समस्यांबाबत तात्काळ माहिती मिळणे शक्य होणार आहे. कर्नाटक शहर मूलभूत सुविधा विकास आणि वित्त निगमने (केयुआयडीएफसी) बेळगावच्या 24 तास पाणीपुरवठ्याची जबाबदारी सोपविलेल्या एल अँड टी कंपनीला हे तंत्रज्ञान पुरवण्यात येणार आहे.
सदर रोबो टेक्नॉलॉजीची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारीवर्गाने पुढाकार घेतला असून राज्यात बेळगावात सर्वप्रथम हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांकडून अंतिम टप्प्याची तयारी सुरू झाली आहे. या रोबो तंत्रज्ञानाचा वापर 24 तास पाणीपुरवठा व्यवस्थेसह अन्य पाणीपुरवठा व्यवस्थेमध्येही केला जाणार आहे.
एकंदर या रोबो टेक्नॉलॉजीमुळे कमी दाबाने पाणी येणे, जलवाहिनीतील ब्लॉकेज, दूषित पाणी पुरवठा, गळती आदी समस्यांचे तात्काळ निदान होऊन दुरुस्तीचे काम लवकर होण्यास मदत होणार आहे. बेळगावनंतर हुबळी -धारवाड आणि गुलबर्गा महापालिकेच्या कार्यक्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.