बेळगाव लाईव्ह :गोवावेस येथे तरूणीची छेडछाड करणार्या रोड रोमीओला लोकांनी चांगलाच चोप दिला. मद्यधुंद असलेल्या रोड रोमीओ गेल्या काही दिवसांपासून तरूणीची छेड काढत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे लोकांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला.
गोवावेस सर्कलजवळ मद्यपी रोडरोमीओ महाविद्यालयीन मुलगी प्रिया (नाव बदलले आहे) हिला त्रास देत आहे. तो प्रियाला अनेक दिवसांपासून धमकावत होता, तिच्याशी मैत्री कर नाहीतर तुला सोडणार नाही, असे धमकावत होता.
आजही असाच प्रकार सुरू होता. त्यावेळी काही तरूणांना मद्यपीबाबत संशय आला. त्यांनी त्या रोडरोमीओला जाब विचारला. प्रियाला त्रास देऊ नकोस म्हणून त्यांनी त्याला यापूर्वी दोनदा ताकीद दिली होती.
पण तो तिला त्रास देत राहिला आणि त्यामुळे त्याठिकाणी जमलेल्या लोकांनी रोमीओला चांगलेच बदडून काढले. सुमारे अर्धा तास हा प्रकार सुरू होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, चौकशीसाठी एकही पोलीस घटनास्थळी पोहोचला नाही.
तरुणांनी रोडरोमीओला पुन्हा इशारा देऊन सोडून दिले. या घटनेबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.