बेळगाव लाईव्ह : एकीकडे जालना येथे मराठा आरक्षणासाठी तरंगे पाटील यांनी उपोषण मार्ग घेतले असताना दुसरीकडे बेळगाव येथील मराठा समाजाने महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील मराठा जातीला “आरक्षण” देण्यासंदर्भात संसदेत आगामी “विशेष अधिवेशन” मध्ये या संदर्भात एक विधेयक मंजूर करा अशी मागणी मराठा समाज सुधारणा मंडळांने केली आहे. पंतप्रधानांना पत्र लिहून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील मराठा जाती ही सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली असून, महाराष्ट्रातील मराठा समाजाकडून शासकीय सेवा आणि शैक्षणिक क्षेत्रात “आरक्षण” देण्याची मागणी फार पूर्वीपासून होत आहे. महाराष्ट्र राज्यानेही आपल्या आरक्षण धोरणात सुधारणा करून मराठा जातीला आरक्षण दिले. आरक्षणाचा कोटा ५० टक्क्यांच्या पुढे गेल्याने सर्वोच्च न्यायालयाने याला फटकारले असेही निवेदनात म्हटले आहे.
आम्ही महाराष्ट्रातील मराठ्यांच्या मागणीला पाठिंबा देतो असे मराठा समाज सुधारणा मंडळाने म्हटले आहे या संघटनेच्या 10 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या आमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या संदर्भात ठराव मंजूर केला आहे.
मराठा आरक्षणासाठी ५०% कोट्याची मर्यादा वाढवण्यासाठी संसदेच्या आगामी “विशेष अधिवेशनात” आवश्यक पावले आणि पुढाकार घेण्यात यावा, जेणेकरून महाराष्ट्रातील मराठ्यांना त्यांचे घटनात्मक अधिकार मिळतील असेही म्हटले आहे.
मराठा समाज सुधारणा मंडळाच्या पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रावर शिवराज पाटील जी जी कानडीकर आणि के एल मजकूर आदींच्या सह्या आहेत.