बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील धर्मवीर संभाजी चौक येथील किर्लोस्कर रोड केळकर बाग कॉर्नरवरील रस्त्यावर आलेला रहदारीस अडथळा ठरणारा धोकादायक जुना इलेक्ट्रिक खांब तात्काळ हटविण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
शहरातील धर्मवीर संभाजी चौक येथील किर्लोस्कर रोड केळकर बाग कॉर्नरवर कित्येक वर्ष जुना इलेक्ट्रिकचा खांब आहे. माथ्यावर विजेच्या तारांचे जंजाळ असलेला हा खांब रस्ता रुंदीकरणाच्या काळात रस्त्यावर आला आहे. तेंव्हापासून हा खांब केळकर बाग कोपऱ्यावरील रहदारीस अडथळा ठरत आहे यात भर म्हणून सदर खांबाच्या ठिकाणी एक अनाधिकृत जाहिरात फलक उभारण्यात आला आहे.
जुना इलेक्ट्रिक खांब आणि या फलकामुळे रहदारीस अडथळा होण्याबरोबरच पादचाऱ्यांची ही गैरसोय होत आहे. या खेरीज किर्लोस्कर रोड येथून धर्मवीर संभाजी चौकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांना केळकर बाग येथून येणाऱ्या वाहन चालकांचा अंदाज येत नाही. तीच स्थिती केळकर बागेतून किर्लोस्कर रोडला येणाऱ्या वाहनचालकांची असते. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे.
शनी मंदिरसमोर पाटील गल्ली व कपिलेश्वर ओव्हर ब्रिज कॉर्नरवर त्याचप्रमाणे विठ्ठल देव गल्ली शहापूर कॉर्नरवर अशाच पद्धतीचे रस्त्यामध्ये आलेले धोकादायक इलेक्ट्रिकचे खांब रहदारीस अडथळा निर्माण करत होते. श्री गणेशोत्सव काळात सार्वजनिक श्री गणेश मूर्ती आणताना किंवा विसर्जनाप्रसंगी या खांबांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मध्यवर्तीय श्री गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हेस्कॉमकडे पाठपुरावा करून अलीकडेच संबंधित खांब हटविले आहेत.
आता केळकर बाग कॉर्नरवरील धोकादायक इलेक्ट्रिक खांबाची बाब गणेश महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांनी महापालिका आयुक्तांच्या कानावर घातली आहे. त्याचप्रमाणे कलघटगी यांनी हेस्कॉम सिटी सब डिव्हिजन नं. 2 च्या अधिकाऱ्यांना काल मंगळवारी प्रत्यक्ष त्या इलेक्ट्रिक खांबाची समस्या निदर्शनास आणून दिली.
तसेच सदर जुना खांब तात्काळ हटवण्याची विनंती केली. यावेळी महामंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.