बेळगाव लाईव्ह :निराश न होता जिद्दीने केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर निश्चितपणे यशाचे फळ मिळते येते हे संतीबस्तवाड येथील पूजा कृष्णा परीट या युवतीने दाखवून दिले आहे.
पूजा हिची देशाच्या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) निवड झाली असून विशेष म्हणजे संतीबस्तवाड परिसरातून बीएसएफच्या माध्यमातून देश सेवेत रुजू होणारी ती पहिलीच तरुणी आहे.
पूजा ही मुळचे लक्केबैल गावचे रहिवासी असलेल्या आणि गेल्या 18 वर्षापासून संतीबस्तवाड येथे स्थायिक झालेल्या कृष्णा परीट यांची कन्या आहे. कृष्णा परीट याचा गावात लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. एक भाऊ असलेल्या पूजाची आई गृहिणी आहे.
आपले एसएसएलसी पर्यंतचे शिक्षण संतीबस्तवाड शाळेमध्ये पूर्ण करणाऱ्या पूजा परीट हिचे पदवी पूर्व शिक्षण जी. ए. कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये झाले असून तिने बेळगावच्या समिती कॉलेजमधून बी.कॉमची पदवी संपादन केली आहे.
समिती कॉलेजमध्ये असतानाच म्हणजे गेल्या 2019 पासून देश सेवा करण्याची इच्छा असलेल्या पूजाने पोलीस खात्यासह देशाच्या निमलष्करी दलात भरती होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. यासाठी तिला घरातून आई-वडिलांचा संपूर्ण पाठिंबा व प्रोत्साहन मिळत होते. त्यामुळे पूजा आवश्यक अभ्यास करण्याबरोबरच दररोज सकाळी 6 ते 8 असा दोन तास धावण्याचा सराव करण्याद्वारे शारीरिक क्षमतेसाठी मेहनत घेत होती. प्रारंभीच्या काळात तिने एसजी आर्मी कोचिंग सेंटरमध्ये तीन महिन्याचे शारीरिक प्रशिक्षण देखील घेतले. त्यानंतर तिला शेट्टी गल्ली येथील टार्गेट कोचिंग सेंटरचे चालक मेटी आणि गुगल कंप्युटर अकादमीचे प्रशांत शहापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. या पद्धतीने करत असलेले प्रयत्न आणि घेत असलेल्या मेहनतीचे फळ म्हणजे पूजा सुतार हिची आता सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे. यासाठी पूजाने गेल्या जानेवारी महिन्यात लेखी परीक्षा आणि मे महिन्यात वंटमुरी येथे शारीरिक चांचणी दिली होती. वैद्यकीय चांचणीत देखील ती उत्तीर्ण झाल्यामुळे नुकतेच तिला नियुक्तीचे पत्र मिळाले आहे.
बीएसएफमधील निवडीचे पत्र मिळताच परीट कुटुंबीयांमध्ये आनंदोत्सव साजरा झाला. यावेळी आई-वडिलांसह हितचिंतकांनी पूजाला मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. पूजा कृष्णा परीट ही आता येत्या 27 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे. बीएसएफमधील निवडीबद्दल पूजाचे आप्तस्वकीयांसह गावात सर्वत्र अभिनंदन होत आहे.