बेळगाव लाईव्ह :सहा मजली भव्य इमारत बांधण्याच्या दृष्टीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नुकतेच व्यापक सर्वेक्षण करण्यात आले. या नियोजित जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या चौफेर दुपदरी मार्गासह दर्शनीय ठिकाणी आकर्षक उद्यान असणार आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा मजली नव्या इमारतीच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मते सदर इमारत उभारणीसाठी 100 ते 150 कोटी रुपये खर्च येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने नव्या कलेक्टर अर्थात जिल्हाधिकारी कार्यालयासाठीचे सर्वेक्षण नुकतेच पार पाडले. नवी इमारत उभारण्यासाठी सध्याची जुनी इमारत आणि तिच्या आसपासच्या उपनिबंधकांचे कार्यालय वगैरे इतर इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. नियोजित जिल्हाधिकारी कार्यालय इमारत 145 मीटर लांब व 71 मीटर रुंद असणार आहे. नवी इमारत दुमजली तळघर आणि चार मजली कार्यालयं अशी एकूण 6 मजली असणार आहे. या नियोजित प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील विस्तृत नऊ एकर जागेचा वापर केला जाणार असून यापैकी दोन एकर जागेत कार्यालयीन इमारत उभारण्यात येणार आहे.
जागेच्या या धोरणात्मक वाटपाद्वारे पार्किंग वगैरे अत्यावश्यक सुविधांसह सुंदर लँडस्केप बगीचा आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांसाठी पुरेशी जागा सुनिश्चित करण्यात आली आहे.
समोर उद्यान व दुपदरी मार्ग असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीचे मुख उत्तरेच्या दिशेला असेल. याखेरीज मुख्य हमरस्त्याच्या बाजूने या इमारतीला अतिरिक्त दोन प्रवेशद्वारे असतील. यापैकी एक मुख्य प्रवेशद्वार असेल तर दुसरे प्रवेशद्वार थेट मागील बाजूस चव्हाट गल्लीला जोडलेले असेल. नूतन जिल्हाधिकारी कार्यालय विकास आराखड्यानुसार आसपासच्या कांही इमारती पाडण्यात येतील. आता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या जागेच्या सर्वेक्षणानुसार इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खर्चाचा तपशील सरकार दरबारी मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावित इमारती बाबत काल सोमवारी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेंगलोर येथे स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी स्थापत्य अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या आराखड्याची सविस्तर माहिती दिली. ती माहिती जाणून घेऊन पालकमंत्री जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना कांही सूचना केल्या. याव्यतिरिक्त त्यांनी बेळगाव येथील अन्य प्रकल्पांबाबतही राज्य स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.