दरवर्षीप्रमाणे बेळगाव वनविभागातर्फे आज 11 सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय वन शहिद दिन’ गांभीर्याने आचरणात आणण्यात आला. यावेळी देशाच्या जंगल आणि वनजीव संपत्तीच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वनविभागाच्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
वनविभाग संकुल, बेळगाव येथे सोमवारी सकाळी बेळगाव सर्कलचे मुख्य वनसंरक्षणाधिकारी मंजुनाथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या राष्ट्रीय वन शहीद दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून बेळगावच्या आदरणीय प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एल. विजयालक्ष्मी देवी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे सन्माननीय अतिथी म्हणून जिल्हाधिकारी नितेश पाटील, शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धारामप्पा, जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, पी.सी. विंग बेळगावचे कमांडर ब्रिगेडियर सी. दयालन आणि जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर उपस्थित होते.
प्रारंभी बेळगाव विभागाचे उपसंरक्षणाधिकारी शंकर के. कल्लोलीकरा व सहाय्यक वनसंरक्षणाधिकारी शिवरुद्रप्पा कबाडगी यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांसह मुख्य वनसंरक्षणाधिकारी सन्माननीय अतिथी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वन शहिदांच्या स्मारकाला पुष्पचक्र व पुष्पदल अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
त्यानंतर राष्ट्रगीत आणि कुशल टोपू फायरिंग झाले. याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुण्या आदरणीय न्यायाधीश एल. विजयालक्ष्मी देवी यांनी शहीद वनाधिकारी आणि वनसंरक्षकांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये असे सांगून पर्यावरण व वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व विशद करण्याद्वारे आपले समयोचित विचार व्यक्त केले.
पाहुण्यांच्या भाषणानंतर दोन मिनिटे मौन पाळून वन शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास बेळगाव वनविभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक आणि निमंत्रित उपस्थित होते.
बेळगाव वन विभागा तर्फे हुतात्मा दिवस.. pic.twitter.com/lFDIiNbv4i
— Belgaumlive (@belgaumlive) September 11, 2023