बेळगाव लाईव्ह :गांव म्हटलं की एकमेकांवर कुरघोडी करणारे दोन गट आलेच. जिथे मतभेद नाहीत, सर्वजण एकोप्याने राहतात अशी कांही मोजकीच गावे असतील आणि त्यापैकी एक आहे नंदगड. खानापूर तालुक्यातील नंदगड गावाला 80 वर्षाची सार्वजनिक श्री गणेश उत्सवाची परंपरा असून नंदगड गाव आदर्शवत अशी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवते हे विशेष होय.
सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळकांनी लोकांना संघटित करण्याकरिता सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची सुरूवात केली. थोडक्यात समाजात एकोपा निर्माण व्हावा हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ उद्देश होता. मात्र सध्या सर्रास एका गावात तीन-चार सार्वजनिक गणपती पहावयास मिळत असून एकोपा निर्माण होण्यापेक्षा खर्च व स्पर्धा वाढत आहे.
नंदगड (ता. खानापूर) गाव हे गाव मात्र त्याला अपवाद आहे. नंदगडमध्ये गेल्या 80 वर्षापासून ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा अखंड सुरू आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे 12 ते 15000 इतकी असून या सर्व लोकांनी एक गाव एक गणपती ही परंपरा आजही अबाधित ठेवली आहे. नंदगड मध्ये फक्त एकच सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ असून त्याचे अध्यक्ष गावचे पंच पी. के. पाटील हे आहेत. या मंडळाकडे पुरेसा शिल्लक निधी असल्यामुळे त्यातूनच दरवर्षी विविध सामाजिक शैक्षणिक व क्रीडा उपक्रम राबविले जातात.
नंदगडच्या बाजारपेठेमध्ये गावातील एकमेव सार्वजनिक श्री गणेश मंडप उभारून श्री मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यानुसार यंदा देखील ती अपूर्व उत्साहासह जल्लोषात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
नंदगडमध्ये जैन, लिंगायत, मराठा, मुस्लिम वगैरे सर्व जाती धर्माचे लोक असले तरी गावात श्री गणेशोत्सवासह सर्व सण एकोप्याने साजरे केले जातात. या पद्धतीने सर्व धर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या या गावातील कुंभार गल्ली मूर्ती कलेसाठी सुप्रसिद्ध आहे. या गल्लीत नंदगड पंचक्रोशीसह बेळगाव, हुबळी, धारवाड आदी परगावच्या सार्वजनिक श्री गणेशाच्या मूर्ती तसेच मातीच्या घरगुती श्रीमुर्ती तयार केल्या जातात. वयोवृद्ध ज्येष्ठ मूर्तिकार 70 वर्षीय ईश्वर गडकरी हे कुंभार गल्लीतील मूर्ती कलेची कार्यशाळा चालवतात. या कार्यशाळाला अतिशय जुनी परंपरा असून गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पूर्वजांपासून ती नंदगड गावात अस्तित्वात आहे. पूर्वी या ठिकाणी वस्तू विनिमय प्रणालीद्वारे (बार्टर सिस्टीम) म्हणजे तांदूळ, जोंधळे, गूळ आदींच्या मोबदल्यात मूर्तींची खरेदी केली जात होती. कालांतराने पैशाचे मोल वाढल्याने आता पैसे देऊन मूर्ती खरेदी केल्या जात असल्या तरी नंदगड गावातील कुंभार गल्ली येथे आज देखील कांही प्रमाणात पूर्वीप्रमाणेच धान्य वगैरेच्या मोबदल्यात मूर्ती विकत घेण्याची पद्धत कायम आहे हे विशेष होय.
मूर्तिकार ईश्वर गडकरी यांची तिसरी पिढी सध्या आपला मूर्ती कलेचा वारसा पुढे चालवत आहे. एकंदर नंदगड गावातील वडीलधारी मंडळींनी सुरू केलेली ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा आजही तेथील तरुण मंडळींनी जपली असून इतर गावांसाठी अनोखा आदर्श निर्माण केला आहे.