बेळगाव लाईव्ह:आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून संख्या मेव्हण्याने दाजींचा निर्घृण खून केल्याची घटना शहरातील विद्यानगर नजीकच्या गणेश नगरमध्ये घडली.
माजी सैनिक इरगौडा टोपगोळ (वय 45 ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संजय भाकरे असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहीती अशी की आज सायंकाळी 5 च्या दरम्यान शहरातील गणेश नगर येथे आपल्या घरात असताना माजी सैनिक इरगौडा टोपगोळ यांच्यावर पत्नीचा मोठा भाऊ संजय भाकरे याने चाकुने खून करून पसार झाला आहे.
इरगौडा टोपगोळ हे मूळचे जैनापूर गावचे रहिवासी असून कांही वर्षांपुर्वी भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. ते शहरातील गणेश नगर येथे घर बांधून 10 वर्षांपासून आपली पत्नी संगीता व एक अपंग मुलग्यासोबत राहत आहेत. तर दुसरा मुलगा मूडबिद्री येथे शिक्षण घेत आहे.
पत्नी संगीता या देखील जैनापूर गावच्या आहेत.
आज सायंकाळी 5 च्या दरम्यान अचानक मेव्हणा संजय याने इरगौडा यांच्यावर चाकूने हल्ला करत गळा चिरून खून करून पसार झाला आहे. सदर खून आरोपी संजय याच्या पत्नीसोबत दाजी इरगौडा याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हा खून केल्याचे पोलीस सूत्रांकडून कळाले आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चिकोडी सीपीआय विश्वनाथ चौगुले भेट देऊन पाहणी केली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह चिकोडी सरकारी इस्पितळात हलविण्यात आला आहे. यावेळी इस्पितळासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मयत इरगौडा हे माजी सैनिक असून गणेश नगर येथील गणपती मंडळाचे अध्यक्ष होते. गणेशोत्सवाच्या तोंडावर हा खून झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.याप्रकरणी पुढील तपास चिकोडी पोलीस करीत आहेत.