बेळगाव लाईव्ह: कित्तूर मार्गे बेळगाव ते धारवाड या नियोजित नव्या रेल्वे मार्गासाठी लवकरात लवकर सर्वेक्षण करून भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी खासदार मंगला अंगडी यांनी एका निवेदनाद्वारे नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांना केली आहे.
खासदार मंगला अंगडी यांनी काल सोमवारी हुबळी येथील नैऋत्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात महाव्यवस्थापकांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. कित्तूर मार्गे बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गाला मंजुरी मिळून चार वर्षे झाली तरी अद्याप भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
यामुळे बेळगाव ते धारवाड प्रवासाच्या वेळेत वाढ झाली असून रेल्वेचे इंधन ही वाया जात आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण झाल्यास भू-संपादनाची प्रक्रिया पार पाडणे सोयीचे होणार असल्याचे खासदार अंगडी यांनी नैऋत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सांगितले.
यावेळी उभयतांमध्ये झालेल्या चर्चेप्रसंगी खासदार अंगडी यांनी बेळगाव परिसरात सुरू असलेल्या रेल्वेच्या कामकाजाचा अहवालही जाणून घेतला. बेळगाव -धारवाड हा रेल्वे मार्ग 73 कि.मी. अंतराचा आहे. सप्टेंबर 2019 मध्ये या मार्गाला मंजुरी देण्यात आली असून रेल्वे मार्गासाठी 924 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
मात्र मंजुरी मिळून ही 4 वर्षे झाली तरी या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळालेली नाही याकडे लक्ष वेधण्याबरोबरच टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील ओव्हर ब्रिजच्या अर्धवट अवस्थेतील कामाचा मुद्दा खासदारांनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिला. तसेच अर्धवट अवस्थेतील या कामामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने सदर काम वेळेत पूर्ण करावे. तसेच बेळगाव -पंढरपूर बेळगाव -पुणे आणि बेळगाव -चेन्नई या मार्गावर रेल्वे सुरू करण्याची विनंतीही खासदार मंगला अंगडी यांनी केली.
त्याला नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याप्रसंगी नैऋत्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.