बेळगाव लाईव्ह:श्री गणेशोत्सवादरम्यान अनुचित प्रकारांना वाव न देता उत्सव सुरळीत शांततेने साजरा करा. कांही अडचण असेल तर महामंडळाशी संपर्क साधा, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी शहरातील सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिर सभागृहामध्ये बेळगाव शहरातील सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांची व्यापक बैठक आज रविवारी सकाळी पार पडली. त्यावेळी कोंडुसकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले की, बेळगावातील गणेशोत्सवाला 1905 पासूनची परंपरा आहे. महामंडळही गणेशोत्सव शांततेत, सुरळीत पार पडावा यासाठी प्रयत्नशील असते. यात आजपर्यंत कोणीही कसलेही राजकारण केलेलं नाही अन करूही नये. उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी विविध मागण्या आम्ही प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यांची दखल घेऊन अधिकारी अडचणी, समस्या सोडवून सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्याबद्दल महामंडळ त्यांचे आभारी आहे. बेळगावातील गोरगरिबांची मुले या उत्सवात जल्लोषाने सहभागी होतात.
कोणाच्या तरी नाहक चुकीमुळे त्यांना त्रास होऊ नये. कोणावर खटले दाखल होऊ नयेत असे वर्तन सगळ्यांनी उत्सवकाळात ठेवावे. गणेशोत्सव मंडळांनी कोणतीही समस्या असल्यास महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, जर त्यांचे फोन लागत नसतील तर थेट माझ्याशी संपर्क साधा, मी तुमच्यासाठी 24 तास सदैव उपलब्ध राहीन, असे आवाहन रमाकांत कोंडुसकर यांनी बैठकीत केले.
मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सरचिटणीस रणजीत चव्हाण-पाटील यावेळी म्हणाले की, बेळगाव शहरात सुमारे 300हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून ती सर्व महामंडळाचा आदेश मानतात. त्यामुळे बऱ्याचदा पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही, मंडळे आमचे ऐकणार नाहीत, तुम्हीच त्यांना सांगा असे आम्हाला खासगीत सांगतात. तथापी सर्व मंडळांनी केवळ गणेशोत्सवाच्या 15 दिवसांत महामंडळाच्या संपर्कात न राहता वर्षभर संपर्कात राहिले पाहिजे. समाजातील अनिष्ट प्रथा दूर करणे हा गणेशोत्सवाचा खरा हेतू आहे.
तो तडीस नेण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी महामंडळाच्या वर्षभर संपर्कात राहिले पाहिजे. विसर्जनादिवशी श्रीमुर्ती वेळेत मंडपाबाहेर काढून मिरवणूक वेळेत संपविणे गरजेचे आहे. हल्ली 40 टक्के श्रीमूर्ती तर मुख्य मिरवणुकीऐवजी थेट विसर्जनाला जात आहेत. तरीही मिरवणूक संपायला दोन दिवस का लागतात? याचा सर्वानी विचार केला पाहिजे असे सांगून आपल्या संस्कृतीनुसार भक्तिमय गाणी लावून मिरवणूक वेळेत काढून वेळेवर सांगता करावी असे आवाहन चव्हाण -पाटील यांनी केले.
शहापूर विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव म्हणाले की, बेळगाव शहर आणि शहापूर विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाशी गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करत आहे. मंडळांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी महामंडळे कार्यरत आहेत. महापालिका, महामंडळ आदींकडून विसर्जन मिरवणूक मार्ग, तलावांची पाहणी आदींबाबत शहापूर विभाग महामंडळाला पूर्वसूचना द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बेळगाव तसेच शहापूर विभागातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध सूचना केल्या. मंडळांच्या विविध समस्यांवर यावेळी व्यापक चर्चा करण्यात आली.
बैठकीला महामंडळ पदाधिकारी महादेव पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, दत्ता जाधव., सागर पाटील, नगरसेविका वैशाली भातकांडे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, माजी नगरसेवक रमेश सोनटक्की, अशोक चिंडक यांच्यासह विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.