बेळगाव लाईव्ह:काळम्मा बेलेवाडी (ता. कागल जि. कोल्हापूर) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला वीज निर्मितीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बेळगावच्या लिओ इंजिनियर्सतर्फे कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल लिओ इंजिनियर्सचे गोपाळ बिर्जे व जयदीप बिर्जे यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांची नुकतीच खास भेट घेऊन त्यांचे अभिनंदन आणि सत्कार केला.
याप्रसंगी महाराष्ट्राचे मंत्री हसन मुश्रीफ हे देखील उपस्थित होते. लिओ इंजिनियर्सकडून सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला वीज निर्मितीसाठी आवश्यक स्टीम टर्बाइनचा पुरवठा करण्यात आला आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला खाजगी गटातून को -जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचा राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट ‘सहवीज प्रकल्प पुरस्कार’ मिळाला आहे. हा पुरस्कार पुणे येथे येत्या 16 सप्टेंबर रोजी प्रदान केला जाणार आहे.
कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिलेल्या माहितीनुसार 2022 -23 या गळीत हंगामात कारखान्याने 10 कोटी 81 लाख 71 हजार 270 युनिट वीज निर्मिती केली आहे. यापैकी 2 कोटी 19 लाख 39 हजार 270 युनिट वीज कारखान्याने स्वतःसाठी वापरली.
त्याचप्रमाणे उर्वरित 7 कोटी 90 लाख 32 हजार युनिट वीज महावितरणाला वितरित केली. त्यातून 53 कोटी 43 लाख रुपये कारखान्याला मिळालेले आहेत.