बेळगाव लाईव्ह: खंजर गल्ली बेळगाव येथील लक्ष्मी मार्केटमधील दुकान गाळ्यांसंदर्भात तेथील व्यापाऱ्यांनी दाखल केलेली याचिका प्रधान वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने रद्दबातल ठरविल्यामुळे त्या 34 गाळ्यांचा लिलाव करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
बेळगाव महापालिकेचे लक्ष्मी मार्केट आधी खंजर गल्ली येथे होते. ते पाडून महापालिकेने त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधले आहे. तथापि त्या संकुलातील गाळ्यांचा कब्जा आधीच काहींनी घेतला आहे.
त्या मार्केटमधील 34 गळ्यांचा लिलाव करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी अधिसूचनाही काढली होती. मात्र पालिकेच्या या निर्णयाला तेथे व्यवसाय करणाऱ्या 34 व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला.
कब्जा आपल्याकडे असल्यामुळे ते गाळे आपल्याला मिळावेत अशी त्यांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. तथापि न्यायालयाने स्थगिती दिली नाही. त्यामुळे त्यांनी वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली, मात्र तेथे देखील त्यांची मागणी मान्य झालेली नाही.
या पद्धतीने वरिष्ठ न्यायालयानेही स्थगिती दिली नसल्याने महापालिकेला आपली लिलाव प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.