बेळगाव लाईव्ह :मराठी लोकांच्या बाबतीत नेहमीच द्वेष करणार्या या कन्नड संघटनांना आता देवातही मराठी-कन्नड असा भेदभाव दिसून येऊ लागला आहे. कारण गणेश उत्सवात देखील कन्नड सक्ती करा अशी मागणी कानडी संघटनेने केली आहे.
आता कन्नड संघटनेच्या कथीत पदाधिकार्यांनी गणेशोत्सवातही कानडीकरण करण्यात यावे, अशी कोल्हेकुई सुरू केली आहे. एकीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मराठी जनतेची मुस्कटदाबी करणाऱ्या आणि दुसरीकडे व्यापारी आस्थापनांवर 60 टक्के कन्नड फलक लावण्यासाठी सक्ती करणाऱ्या मनपा कडून दुटप्पीपणा महापालिकेकडून होत आहे असा प्रश्न यानिमत्ताने उपस्थित झाला आहे .
बेळगाव शहरातील व्यापारी आस्थापनांवर 60 टक्के भागात कन्नड अक्षरे लिहिण्याचा फतवा महापालिकेने काढला आहे. त्यामुळे लोकांत तीव्र संताप व्यक्त होत असतानाच आता कन्नड संघटनेच्या काही पदाधिकार्यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची भेट घेऊन गणेशोत्सव मंडळांविरोधात कोल्हेकुई केली.
बेळगावात सर्व गणेशोत्सव मंडळात मराठी भाषेचा वापर करण्यात येतो. त्याठिकाणी कन्नडला प्राधान्य देण्यात येत नाही. त्यामुळे हा सण महाराष्ट्राचा असल्याचे दिसून येते. आता या सणाचेही कानडीकरण करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव मंडळांच्या फलकांवर कन्नडचा वापर करण्यात यावा. मंडपात कन्नड फलक लावण्यात यावेत, यासाठी महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी कन्नड संघटनांनी केली.
पुण्यानंतर बेळगावात सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. लोकमान्य टिळकांनी बेळगावात गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवले. या सणाला ऐतिहासिक महत्व असतानाही कन्नड संघटनांना केवळ भाषिक व्देष दिसून येत आहे. कन्नड फलकांचा फतवा काढल्यामुळे महापालिकेचे अभिनंदन करताना आता गणेशोत्सव मंडळांचे कानडीकरण करण्यात यावे, यासाठी कोल्हेकुई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून आहे.
महापौर, उपमहापौरांची भुमिका काय?
शहरात कन्नडसक्तीचा फतवा काढण्यात आला आहे. आता सार्वजनिक गणेशोत्सवांचेही कानडीकरण करण्यात यावे, अशी काहींनी मागणी केली आहे. त्यामुळे सर्वांवर महापौर आणि उपमहापौर कोणती भुमिका घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. या कानडी सक्तीच्या मुद्द्यावर पालकमंत्री सतीश जारकीहोळी काय करणार? कारण सहा महिन्यात लोकसभा निवडणूक आहे आणि मराठी जनतेच्या जखमेवर मीठ ठेवणार का? याकडेही लक्ष लागून राहिले आहे