बेळगाव लाईव्ह :श्री गणेश उत्सवाला नुकतीच सुरुवात झाली नाही तोवर कंग्राळी बी. के. गावाचा दोन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला विसर्जन कुंड अर्थात तलाव फुटला असून हा चर्चेचा विषय झाला आहे. तसेच श्री विसर्जनासाठी नव्या ठिकाणी व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.
बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी. के. पंचायत तलावाची सुधारणा करताना दीड वर्षांपूर्वी त्या ठिकाणी गावासाठी सिमेंट काँक्रेटचा विसर्जन कुंड बांधण्यात आला आहे. या कुंडाच्या बांधकामासाठी 1 कोटी 15 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला असला तरी सध्या ऐन श्री गणेशोत्सव काळात या विसर्जन कुंडाची एका बाजूची भिंत कोसळली आहे.
कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेला नवा कुंड अशाप्रकारे अवघ्या दोन वर्षात फुटून पाण्यात विसर्जित झाल्यामुळे गावात उलटसुलट चर्चा होत आहे. तसेच अवैज्ञानिक व निकृष्ट बांधकामामुळे थोडक्यात भ्रष्ट बेजबाबदार कारभारामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप केला जात आहे.
विसर्जन कुंड फुटल्यामुळे आता गावातील श्री मूर्ती विशेष करून सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी श्री गणेश विसर्जनाकरिता तात्काळ नवीन ठिकाणी व्यवस्था केली जावी, अशी कंग्राळी बी. के. गावातील समस्त सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि ग्रामस्थांची मागणी आहे.
दरम्यान, यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना कंग्राळी बी. के. गावचे रहिवासी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण म्हणाले की, श्री गणेश विसर्जनापूर्वीच आमच्या गावाच्या विसर्जन कुंडाची भिंत पाण्यात विसर्जित झाली ही दुर्दैवाची गोष्ट आहे. लघु पाणीपुरवठा खाते आणि भूजल विकास मंडळातर्फे गेल्या 2021 मध्ये कंग्राळी बी. के. गावच्या तलावाचे सुशोभीकरण आणि श्री गणेश विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात आली होती. सदर विकास कामासाठी 1 कोटी 15 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. तसेच पूर्ण झालेल्या या विकास कामाचा उद्घाटन सोहळा बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पार पडला होता.
मात्र दुर्दैवाने यंदा तिसऱ्याच वर्षी काल शुक्रवारी भिंत कोसळून विसर्जन कुंड पाण्यात विसर्जित झाला आहे. सांगण्याचा उद्देश हा की जवळपास 1 कोटी 15 लाख रुपये खर्चून हा विसर्जन कुंड बांधण्यात आला असला तरी के. बी. पाटील नामक कंत्राटदाराने केलेले निकृष्ट दर्जाचे बांधकाम कालच्या घटनेस कारणीभूत ठरले आहे.
ज्यामुळे जनतेचा पैसा पाण्यात गेला आहे. यासाठी संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जावी, अशी आम्हा समस्त गावकऱ्यांची मागणी आहे असे ॲड. चव्हाण यांनी स्पष्ट केले.