बेळगाव लाईव्ह :कधी नव्हे ती हेस्कॉम ही संस्था आपली जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे कार्यतत्पर झाल्याचे या गणेशोत्सव काळात पहावयास मिळत आहे. सध्या बेळगाव शहरातील अनेक ठिकाणी असलेले विजेच्या जुन्या खांबांचे अडथळे तसेच रस्त्यावर खाली लोंबकळणाऱ्या धोकादायक विजेच्या तारांचे जंजाळ हटवण्याचे काम हेस्कॉमने युद्ध पातळीवर हाती घेतले आहे.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अलीकडेच केलेल्या सक्त सूचनेनंतर जबाबदारीची जाणीव झालेल्या हेस्कॉमने आपल्याशी संबंधित शहरातील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली आहे. हेस्कॉम या पद्धतीने कार्यतत्पर होण्यास मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचा पाठपुरावा देखील कारणीभूत ठरला आहे.
बेळगाव शहरातील श्री शनी मंदिर समोरील पाटील गल्ली व कपलेश्वर ओव्हर ब्रिजच्या कॉर्नरवर रस्ता रुंदीकरणामुळे विजेचा एक खांब भर रस्त्यात आला होता. वळणाच्या ठिकाणी रस्त्यात असलेल्या या खांबामुळे रहदारीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढला होता.
रहदारीस अडथळा ठरणारा रस्त्यातील हा विजेचा खांब हटवावा या मागणीचे वृत्त बेळगाव लाईव्हने अलीकडेच प्रसिद्ध केले होते. याची कल्पना गणेश महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांनी हेस्कॉनच्या अधिकाऱ्यांना दिली. त्याची तात्काळ दखल घेत हेस्कॉमने रस्त्यावर असलेला तो काम नुकताच युद्धपातळीवर हटविला आहे.
एकंदर गणेश महामंडळाचा पाठपुरावा, हेस्कॉनची तत्परता आणि बेळगाव लाईव्हची बांधिलकी यातून संबंधित खांब तत्परतेने हटवण्याचे कार्य झाल्यामुळे स्थानिक दुकानदार, व्यावसायिक व वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.