बेळगाव लाईव्ह :उत्तर कर्नाटकातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या बेळगावच्या श्री गणेशोत्सवाची आज बुधवारी सांगता होत असून श्री कपिलेश्वर तलावासह शहरातील अन्य तलावांच्या ठिकाणी आज सकाळपासून फटाक्यांच्या आतषबाजीत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात श्री मूर्तीचे विसर्जन करून बाप्पाला निरोप देण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
शहरातील घरोघरी गेल्या 19 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी दिवशी गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मागील नऊ दिवसांमध्ये गणेश भक्तांनी बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केली. त्यानंतर परंपरेनुसार आज गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणेश भक्त आपल्या बाप्पाला निरोप देत आहेत.
शहरातील प्रमुख विसर्जन तलाव असलेल्या कपिलेश्वर तलावासह अन्य तलावांच्या ठिकाणी घरगुती श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषासह फटाक्यांच्या आतषबाजीत शेवटची पूजा व आरती करून तलावाच्या ठिकाणी उपस्थित गणेश भक्त जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होते. कपिलेश्वर तलावाच्या ठिकाणी मदतीसाठी नियुक्त जलतरणपटू घरगुती श्रीमूर्ती स्वीकारून तलावाच्या मध्यभागी जाऊन विसर्जित करत असल्याचे पहावयास मिळत होते.
सार्वजनिक श्री गणेश मूर्तींचे विसर्जन दुपारनंतर सुरू होणार असल्यामुळे प्रत्येक विसर्जन तलावाच्या ठिकाणी आज सकाळपासून आपापल्या घरगुती श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती.