बेळगाव लाईव्ह :वन खात्याच्या कार्यासयासमोर आंदोलन करताच वनाधिकाऱ्यानी गुरुवारी हलशीवाडी येथे येऊन निवेदन स्वीकारले आहे. यावेळी पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
गेल्या आठ दिवसात हलशी, हलशीवाडी परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच ५० हुन अधिक एकरातील ऊस व भात पिकाचे नुकसान झाल्याने संताप झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी मेरडा येथील वन खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते तसेच कार्यालयाला टाळे लावण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा वनाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा इशारा दिला होता. त्यामूळे मेरडा विभागाचे वनाधिकारी एन हिरेमठ यांनी सायंकाळी हलशीवाडी येथे येऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर गावातील जुन्या मराठी शाळेमध्ये शेतकरी आणि वनाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
दत्तात्रय देसाई यांनी दरवर्षी अशाच प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व्यापक उपायोजना कराव्यात जंगलातील प्राणी शिवारात किंवा गावांमध्ये येऊ नये याची दखल घेण्याची जबाबदारी वन खात्याची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा शेतकरी स्वस्त बसणार नाहीत असा इशारा दिला.
पुंडलिक देसाई यांनी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यावेळी वन खात्याला निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र फक्त पंचनामा करून शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सूचना करण्यात आली. परंतु अर्ज करून देखील फक्त दोनच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे यावेळी कोणीही अर्ज करणार नाही याची दखल घेऊन तातडीने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा शेतकरी स्वस्त बसणार नाही असा इशारा दिला.
रघुनाथ देसाई, विठ्ठल देसाई, राजू देसाई आदींनी विचार मांडले. वनाधिकारी हिरेमठ यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली जाईल. तसेच वन्य प्राण्यांचा त्रास होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी कुंपण घालून घ्यावे अशी सूचना केली.
यावेळी प्रमोद देसाई, रवींद्र देसाई, रघुनाथ देसाई , मल्लाप्पा देसाई, पुंडलिक देसाई, प्रमोद देसाई, सुभाघ देसाई, विनोद देसाई, विनायक देसाई, रोहन देसाई, बबन देसाई, राजू देसाई, प्रकाश देसाई, गणपती देसाई, रामचंद्र देसाई, शंकर देसाई यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.