बेळगाव लाईव्ह : लहान मुलांचा लाडका सण म्हणजे गणपती उत्सव! गणेश उत्सवात विद्यार्थी आगमना दिवशी आनंदी असतात अश्यालाडक्या गणरायाचे मंगळवारी (दि. 19) आगमन होणार आहे. त्यासाठी अबालवृद्धांनी जोरदार तयारी केली आहे. पण, राज्य सरकारने मात्र सोमवारी (दि. 18) सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे ज्या दिवशी गणरायाचे आगमन होणार त्या दिवशी शाळांसह सर्व सरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत. शाळा प्रशासन स्वत: मंगळवारी स्थानिक सुट्टी जाहीर करणार असले तरी अधिकृत सुट्टीबाबत सरकारच निर्णय घेऊ शकते, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगाव लाईव्ह शी बोलताना म्हंटले आहे.
गणपतीच्या आगमनादिवशी सरकारी सुट्टी देण्यात येते. पण, राज्य सरकारने यंदा सरकारी सुट्ट्या जाहीर करतानाच गणरायाच्या आगमनाच्या आधल्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. मंगळवारी गणेश चतुर्थी असूनही त्याठिकाणी बँका, सरकारी कार्यालये सुरू राहणार आहे.
बेळगाव शहरातील बहुतांशी शाळांनी मंगळवारी स्थानिक सुट्टी जाहीर केली असली तरी ती अधिकृत सुट्ठी नाही.
गेल्या आठ दिवसांपासून या सुट्टीबाबत चर्चा सुरू झाली आहे. पण, सरकारने दक्षिण कन्नड जिल्हा वगळता एकाही जिल्ह्याला मंगळवारी सुट्टी दिलेली नाही. त्यामुळे मंगळवारी सरकारी कामकाज सुरू राहणार आहे.
डी डी पी आय अर्थात जिल्हा शिक्षणाधिकारी नलतवाड यांनी मंगळवारी सरकारी सुट्टी नसली तरी स्थानिक पातळीवर शाळा प्रशासानाने सुट्टीचा निर्णय घेऊ शकतात, असे सांगितले आहे. दरवर्षी गणेश चतुर्थी दिवशी सरकारी सुट्टी आणि ऋषी पंचमी दिवशी स्थानिक सुट्टी देण्यात येते. यंदा मात्र अनेक शाळांनी सरकारी सुट्ठी असलेल्या सोमवारी शाळा भरवण्याचा आणि मंगळवार व बुधवारी स्थानिक सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याशी बेळगाव लाईव्हने संपर्क साधला असता त्यांनी सरकारने मंगळवारी कोणत्याही प्रकारे सुट्टी जाहीर केली नाही. त्यामुळे त्याठिकाणी सर्व सरकारी कार्यालये सुरू असतील, असे सांगितले.
दक्षिण कन्नड जिल्हाधिकार्यांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन सोमवारऐवजी मंगळवारी गणेशोत्सवाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेला आला होता. पण, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सोमवारीच जिल्ह्यात सुट्टी असेल, असे सांगितले आहे.