बेळगाव लाईव्ह :कांही ठराविक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळे अशी असतात की ती त्यांच्या अतिशय भव्य अशी श्री गणरायाची मूर्ती, नेत्रदीपक सजावट, हलते देखावे अशा वैशिष्ट्यांबद्दल सुप्रसिद्ध असतात. याच मंडळांपैकी एक आहे शहरातील जय किसान होलसेल भाजी मार्केट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ जे देशातील धार्मिक स्थळांचे वैशिष्ट्यपूर्ण भव्य देखावे सादर करणारे मंडळ म्हणून सुपरिचित आहे. यंदा 35 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या मंडळाकडून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर केला जाणार आहे.
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ जय किसान होलसेल भाजी मार्केटची स्थापना 1989 मध्ये बेळगावच्या भुईकोट किल्ल्यानजीकच्या तत्कालीन कॅन्टोन्मेंट होलसेल भाजी मार्केटमध्ये झाली. तेंव्हापासून गेली 34 वर्षे या मंडळांने देशातील प्राचीन ऐतिहासिक मंदिरे व धार्मिक स्थळांचे देखावे सादर करण्यावर प्राधान्याने भर दिला आहे. या मागचा मुख्य हेतू हा की शहर परिसरातील सर्वसामान्य गोरगरीब लोक ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशांना परराज्य अथवा देशातील सुप्रसिद्ध मंदिरं व धार्मिक स्थळांचे दर्शन बेळगावातच घडावे हा होय.
यापूर्वी जय किसान होलसेल भाजी मार्केट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने अमृतसर येथील सुवर्ण मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, श्री मार्लेश्वर मंदिर वगैरे असंख्य धार्मिक स्थळांसह शिवकालीन गडकिल्ल्यांचे भव्य देखावे सादर केले आहेत. त्यानुसार धार्मिक स्थळांचे देखावे सादर करण्याची आपली परंपरा या मंडळाने यंदा 35 व्या वर्षीही कायम ठेवली आहे. यावर्षी सदर मंडळाकडून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिराचा हुबेहूब देखावा सादर केला जाणारा असून त्या अनुषंगाने जय्यत तयारी केली जात आहे.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हच्याशी जय किसान होलसेल भाजी मार्केट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली असता ते म्हणाले की, आमच्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ जय किसान होलसेल भाजी मार्केट बेळगाव या मंडळाची स्थापना 1989 मध्ये कॅन्टोन्मेंट होलसेल भाजी मार्केटमध्ये झाली. त्यानंतर जवळपास तीस वर्ष हे मंडळ श्री गणेश उत्सवानिमित्त सातत्याने वैशिष्ट्यपूर्ण देखावे सादर करत आले आहे. शहरातील सर्वसामान्य गरीब जनतेला परिस्थितीमुळे भेटी देता येणे शक्य नसलेली देशातील सुप्रसिद्ध मंदिर, प्राचीन ऐतिहासिक धार्मिक व प्रेक्षणीय स्थळ, शिवकालीन गडकिल्ले आदींचे देखावे सादर करण्याची परंपरा आजपर्यंत आमच्या मंडळांने जपली आहे.
यावर्षी आम्ही अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिराची प्रतिकृती साकारत आहोत. यापूर्वी आम्ही तिरुपती बालाजी मंदिर, श्री मार्लेश्वर मंदिर, श्री महामाळेश्वर मंदिर, प्रतापगड, अमृतसरचे सुवर्ण मंदिर असे देखावे सादर केले आहेत. सुवर्णमंदिराचा देखावा सादर केला त्यावेळी तर शहरातील शीख बांधवानी मोठ्या संख्येने आमच्या या मंदिराला भेट देऊन श्री गुरुगोविंदांचे आशीर्वाद घेतले होते.
मागील वर्षी छ. शिवाजी महाराजांचा काल्पनिक देखावा सादर करण्यात आला होता अशी माहिती देऊन आता यंदा अक्कलकोट श्री स्वामी समर्थं मंदिराचा हुबेहूब देखावा सादर केला जाणार आहे. तरी शहरवासीयांनी मोठ्या संख्येने या देखाव्याला भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.
https://x.com/belgaumlive/status/1702223100425785364?s=20