विद्युत भारित तारेला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून वडील आणि मुलगा असे दोघेजण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना बैलहोंगल (जि. बेळगाव) तालुक्यातील उडकेरी गावात घडली आहे.
प्रभू हुंबी (वय 69) आणि मंजुनाथ हुंबी (वय 29) अशी मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी बाप लेकांची नावे आहेत. घरासमोर असलेल्या विद्युत खांबाच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे हे एकाच कुटुंबातील दोघेजण जागीच ठार झाले.
घरासमोरील कचरा काढताना हा प्रकार घडल्याचे समजते. आपले वडील प्रभु हुंबी यांना विजेचा शॉक लागल्याचे निदर्शनास येतात मुलगा मंजुनाथ त्यांना वाचविण्यासाठी पुढे धावला असता त्याला देखील विजेचा तीव्र धक्का बसून दोघेही जागीच गतप्राण झाले. हेकॉमच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप केला जात आहे. दोदवाड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
ऐन पावसाळ्यात विद्युत वाहिन्यांमुळे विजेचा धक्का बसण्याच्या घटनात वाढ झाली आहे. मागील महिन्यात बेळगाव शहरातील शाहूनगर भागात वृद्ध दांपत्य आणि लहान मुलगी असे तिघेजण विजेचा तीव्र धक्का बसून जागीच ठार झाले होते.
त्यानंतर बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे देखील एक दांपत्य शेतात जिवंत विद्युत वाहिनी अंगावर पडून मरण पावले होते. आता ही बैलहोंगल मधली घटना घडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात सतर्कता बाळगून काम करणे गरजेचे आहे.