बेळगाव लाईव्ह :यावर्षी पावसाभावी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती व पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यात येत असून सरकारला त्याचा अहवाल त्वरित सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
बेळगाव व खानापूर तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्यानंतर काल बुधवारी जिल्हाधिकारी शेतकऱ्यांशी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भात, सोयाबीन, बटाटा, रताळी, कोबी, भुईमूग आदी पिकांच्या नुकसानीची तसेच जनावरांच्या चाऱ्याच्या टंचाईची शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. पावसाअभावी जमिनीतील पाण्याचा अंश कमी होऊन त्याचा पिकावर परिणाम झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली. .
शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यापूर्वी जिल्हाधिकारी पाटील व भोयर यांनी कृषी अधिकाऱ्यांसमवेत खानापूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी लालवाडी, झुंजवाड, के. एन. बिडी, भुरणकी, मंग्यानकोप्प, केरवाड येथील पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या गावांमध्ये चारा टंचाई देखील निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर दोन्ही तालुक्यातील पीक नुकसानीचा अहवाल त्वरित सादर करण्याची सूचना कृषी अधिकाऱ्यांना केली.
दरम्यान, कृषी खात्याचे सहाय्यक संचालक शिवणगौडा पाटील यांनी बेळगाव व खानापूर तालुक्यात पावसा अभावी नुकसान झालेल्या पिकांची माहिती दिली. फळबागायत खात्याची उपसंचालक महांतेश मुरगोड यांनी फळबागायत पीक परिस्थितीची माहिती दिली.
पावसाअभावी दोन्ही तालुक्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याचे पशु संगोपन खात्याचे उपसंचालक डाॅ. राजीव कुलेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात बेळगावचे तहसीलदार बसवराज नागराळ यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता.