बेळगाव लाईव्ह: आपल्या समस्यांच्या निवारणासाठी बेंगलोरला जाण्याचे सार्वजनिकांचे कष्ट वाचविण्याकरता स्थानिक पातळीवर ‘जनता दर्शन’ कार्यक्रमाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तेंव्हा नागरिकांनी या कार्यक्रमाचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन कर्नाटक सरकारचे नवी दिल्ली विशेष प्रतिनिधी -2 प्रकाश हुक्केरी यांनी केले.
शहरातील केपीटीसीएल समुदाय भावनांच्या सभागृहामध्ये आज मंगळवारी सकाळी आयोजित जनता दर्शन कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून केल्यानंतर ते बोलत होते. नागरिकांचे आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी बेंगलोरपर्यंत जाण्याचे कष्ट वाचावेत यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे, असे हुक्केरी यांनी सांगितले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांनी जनता दर्शन कार्यक्रमामुळे सार्वजनिकांना आपल्या समस्यांचे स्थानिक पातळीवरच निवारण करून घेणे शक्य होणार आहे असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांचा सहभाग असल्यामुळे या कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ घेऊन नागरिकांनी आपल्या समस्यांचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन आमदार सेठ यांनी केले.
प्रारंभी आपल्या स्वागत आणि प्रास्ताविकामध्ये जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दरमहा जिल्हा पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पातळीवर आणि दर पंधरा दिवसातून एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तालुका पातळीवर जनता दर्शन कार्यक्रम होईल. नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे लेखी निवेदन स्वीकारून जागीच त्यांचे निवारण करणे हा जनता दर्शन कार्यक्रमाचा उद्देश आहे.
जनतेची लेखी अर्ज -निवेदनं स्वीकारण्यासाठी आठ काउंटर सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी स्वीकारले जाणारे अर्ज आयपीजीआरएस पोर्टलमध्ये दाखल केले जातील. जिल्हा पातळीवरील अर्ज -निवेदने जागेवर तात्काळ निकालात काढली जातील राज्य सरकारच्या अखत्यारीतील अर्ज व निवेदने पुढील कार्यवाहीसाठी पाठविली जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी पाटील यांनी दिली.
याप्रसंगी कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, अप्पर जिल्हाधिकारी विजकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, जिल्हा पंचायत उपसचिव बसवराज हेग्गनायक, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, चिक्कोडी उपविभागाधिकारी माधव गीते, आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी शुंभ शुक्ला आदी उपस्थित होते. आजच्या जनता दर्शन कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला प्रारंभ झाल्यानंतर जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांनी व्यासपीठावर जाऊन तसेच सभागृहाच्या ठिकाणी स्थापन केलेल्या आठ काउंटरच्या ठिकाणी जाऊन आपापल्या तक्रारी व समस्यांचे अर्ज दाखल केले. जनता दर्शन कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांसाठी दुपारच्या जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती.