बेळगाव लाईव्ह :नाझर कँप, वडगाव येथील धोकादायक हौदात गणेश मूर्ती विसर्जन करण्यात येते. त्यामुळे या हौदाची पाहणी करून तो तत्काळ बंद करावा, अशी मागणी शहापूर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने गुरुवारी (दि. 14) महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे केली.
नाझर कँप येथे हौदात घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. पण, हा हौद धोकादायक बनला आहे. त्यामुळे महापालिकेने हौदानाची पाहणी करून तो तत्काळ बॅरिकेडस लावून बंद करावा. अन्यथा या ठिकाणी दुर्घटना घडू शकते. यासाठी काळजी घ्यावी अशी मागणी शहापूर विभाग गणेश महामंडळाने केली आहे.
या भागातील लोकांना गणेश मूर्ती विसर्जनासाठी जुने बेळगाव येथील कल्मेश्वर तलावाकडे जावे लागते. त्यामुळे पुढील वर्षी वडगाव परिसरातील भाविकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. जुने बेळगाव येथे सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी वाढीव क्रेनची व्यवस्था करावी, अशी मागणी आयुक्त दुडगुंटी यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोंटक्की, उपाध्यक्ष अशोक चिंडक, सचिव राजू सुतार, अमृत भाकोजी, दिनेश मेलगे, पी. जे. घाडी, संजय शिंदे, शंकर केसरकर आदी उपस्थित होते.