बेळगाव लाईव्ह: बेळगाव महानगरपालिका आयुक्तांना एखाद्या गैरप्रकारात गोवून त्यांची बदली करण्याचा कुटील डाव कांही राजकीय नेत्यांकडून रचला जात असून त्यांच्या या षडयंत्रापासून मनपा आयुक्तांचे संरक्षण करावे, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिवार बेळगावने सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे.
भ्रष्टाचार निर्मूलन परिवार बेळगावचे अध्यक्ष सुजित मुळगुंद आणि ॲड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखालील वकिलांच्या शिष्टमंडळांने उपरोक्त मागणीचे निवेदन नुकतेच जिल्हा पालकमंत्र्यांना सादर केले.
निवेदनाचा स्वीकार करून पालकमंत्री जारकीहोळी यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले अशोक दुडगुंटी हे एक कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी असून दुष्ट राजकीय हेतूने त्यांच्या बाबतीत समस्या निर्माण करून त्यांची बदली करण्याचा प्रयत्न कांही स्थानिक राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. विद्यमान महापालिका आयुक्त हे बेळगावात अधिकार पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जनहितार्थ कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे सार्वजनिकांना न्याय मिळत असून बेकायदेशीर प्रकारांना आळा बसू लागला आहे.
मनपा आयुक्त सार्वजनिक त्यांचे हित जपण्यात यशस्वी होत आहेत. ही चांगली गोष्ट पहावत नसल्यामुळे कांही राजकीय नेते दुष्ट हेतूने कांही अप्रमाणिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने कोणताही संबंध नसलेल्या गैरप्रकारात महापालिका आयुक्तांना गोवून त्यांची अन्यत्र बदली करण्याच्या प्रयत्नात आहेत
. तेंव्हा अशोक दुडगुंटी यांच्यासारख्या एका कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकाऱ्याचे संरक्षण करणे ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्यावर बेळगावच्या जनतेचा मोठा विश्वास आहे आणि तुम्ही कांही चुकीचे घडू देणार नाही याची खात्री आहे. तरी याप्रकरणी चौकशी करून स्वार्थी नेते मंडळींना सहाय्य करणाऱ्या अधिकारी आणि संबंधित नेत्यांपासून महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी यांचे संरक्षण करावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे अध्यक्ष सुजित मुळगुंद व ॲड. एन. आर. लातूर यांच्या समवेत ॲड. विनोद पाटील, ॲड. रोहित लातूर, ॲड. डी. एस. बिळगी, ॲड. अनिल शिंदे, ॲड. सुभाष कांबळे, ॲड. यशवंत लमाणी, ॲड. रेणुकाराज एच. आदी उपस्थित होते.