बेळगाव लाईव्ह :हलगा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम रखडले असून तीन वर्षांत केवळ 55 टक्केच काम झाले आहे आगामी सहा महिन्यात हे काम पूर्ण व्हायचे आहे त्यामूळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार असा प्रश्न विचारला जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून हलगा येथे सुरू असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम केवळ 55 टक्केच पूर्ण झाले आहे. या कामाची मुदत उलटली तरी काम पूर्णत्वाकडे आलेले नाही. त्यामुळे महापालिकेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
तब्बल 162 कोटी रुपये अनुदानातून 2020 मध्ये हलगा येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत मार्च 2023 होती. पण, कोरोना आणि इतर तांत्रिक कारणांमुळे ही मुदत मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, अजूनही 45 टक्के काम अपूर्ण आहे.
शहर पायाभूत सुविधा विकास मंडळाकडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवण्याची जबाबदारी असून मंडळाने निविदा प्रक्रिया राबवत हे काम पुणे येथील कंपनीला दिले आहे. पण कंत्राट घेतलेल्या कंपनीने वेळेत हे काम पूर्ण न केल्याने कंपनीला यापूर्वीच 1 कोटी 40 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सांडपाणी पाईपलाईनचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. पाणी साठ्यासाठी दोन विहिरींचे काम हाती घेण्यात आले आहे.
शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी विविध नाल्यात मिसळते. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्यामुळे महापालिकेला स्वच्छ शहरांच्या यादीत मागे पडावे लागते. त्यामुळे हे काम पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर असणार आहे. पायाभूत विकास मंडळाकडून हे पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.
हलगा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकर पुर्ण व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहोत. त्याची सातत्याने पाहणी केली जात आहे. पुढील सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर त्यावर यंत्र उपकरणे जोडली जाणार आहेत.
अशी मा अशोक दुडगुंटी, आयुक्त महापालिका.