बेळगाव लाईव्ह:प्रसूत झाल्यानंतर मातेने आपल्या नवजात मृत अर्भकाला भरवस्तीतील झुडपात फेकून दिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना रामतीर्थनगर येथे आज शनिवारी उघडकीस आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
शहरातील रामतीर्थनगर येथील भरवस्तीत असलेल्या खुल्या भूखंडाच्या ठिकाणी आज सकाळी पुरुष जातीच्या नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. सदर प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडवून घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
दरम्यान याबाबतची माहिती स्थानिकांनी माळमारुती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलकडे धाडला. रामतीर्थनगर येथे भरवस्तीतील संबंधित भूखंड पडीक आहे.
तिन्ही बाजूला इमारती असलेल्या या भूखंडामध्ये झुडपं व रान वाढले असून याचा फायदा घेत अज्ञातांनी या ठिकाणी झुडपात ते अर्भक फेकून दिले होते. या प्रकाराबद्दल स्थानिकांमध्ये विशेष करून महिला वर्गात हळहळ व्यक्त होत होती.
याप्रकरणी माळ मारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून कुणाचे अर्भक आहे कुणी फेकले असावे याबाबत अधिक तपास सुरू आहे .