बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील ऐतिहासिक श्री गणपती विसर्जन मिरवणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
त्या अनुषंगाने शहराचे पोलीस आयुक्त सिद्धारामप्पा यांनी आज सकाळी सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा आणि वाहतूक व्यवस्थापन कक्षातील कामकाजाची पाहणी केली.
आजच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त शहरांमध्ये सुमारे 2000 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणारा असून 487 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 8 ड्रोन कॅमेऱ्याची मिरवणुकीवर नजर असणार आहे.
या सर्व कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या शहरातील प्रमुख मार्ग व चौकावर नजर ठेवण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी बेळगाव शहर पोलीस आयुक्त सिद्धारामप्पा यांनी आज गुरुवारी सकाळी शहराच्या सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा आणि वाहतूक व्यवस्थापन कक्षाला भेट दिली.
याप्रसंगी त्यांनी तेथील कामकाजाची माहिती जाणून घेऊन ते व्यवस्थित सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.