बेळगाव लाईव्ह:श्री गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या समस्या व अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रशासनाने सार्वजनिक श्री गणेश मंडपाच्या ठिकाणी स्वच्छता राखली जाईल, त्या ठिकाणचे ड्रेनेज व गटारी स्वच्छ केल्या जातील याची देखील काळजी घ्यावी, अशी मागणी शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाकडून केली जात आहे.
मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या सूचना व आणि विनंतीनुसार प्रशासनाकडून विविध खात्यांमध्ये समन्वय राखत श्री गणेशोत्सव काळात निर्माण होणारे अडथळे व समस्या दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने हेस्कॉमने ठीक ठिकाणी रहदारीस अडथळा ठरणारे काम त्याचप्रमाणे धोकादायकरीत्या खाली लोणकरणाऱ्या विजेच्या तारांची समस्या दूर केली आहे .
महापालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्यांची दुरुस्ती तसेच काही ठिकाणी नूतनीकरण केले जात आहे. याबरोबरच आता सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडपांचा परिसरात स्वच्छता राखण्याबरोबरच त्या ठिकाणच्या गटारी व ड्रेनेजची साफसफाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.
कारण सध्या बऱ्याच सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडपाच्या ठिकाणीची गटारे तुंबलेल्या अवस्थेत आहेत. या तुंबलेल्या गटारीमुळे गणेशोत्सव काळात मंडप परिसरात दुर्गंधीयुक्त अस्वच्छ वातावरण पसरून गणेश भक्तांना त्रास होऊ शकतो.
सध्या शहरातील बऱ्याच सार्वजनिक श्री गणेश मंडपाच्या परिसरात स्वच्छता साफसफाईची गरज आहे. वेळच्यावेळी सफाईचे काम होत नसल्यामुळे काही मंडप परिसरातील गटारी व ड्रेनेज तुंबलेल्या आहेत. श्री शनी मंदिराजवळील भगतसिंग चौक, पाटील गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाच्या ठिकाणी तर काल गटार तुंबून सांडपाणी रस्त्यावर आले. संबंधित गटारीची वेळच्यावेळी सफाई केली जात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या या गटारीचे सांडपाणी थेट मंडपात शिरले होते. याबाबतची माहिती मिळताच गणेश महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी व अन्य पदाधिकाऱ्यांनी तात्काळ भगतसिंग चौक येथे जाऊन तुंबलेल्या गटारीची समस्या जाणून घेतली. त्यानंतर कलघटगी यानी लागलीच सदर समस्येची माहिती महापालिका आयुक्तांना दिली.
पावसाळा अद्याप संपलेला नाही. त्यामुळे गणेशोत्सव काळात जोरदार पाऊस झाल्यास उपरोक्त समस्या शहरातील अन्य मंडपांच्या ठिकाणी उद्भवू शकते. तरी महापालिका आयुक्तांसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहरातील सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडपांचा परिसर तेथील गटारी, ड्रेनेज यांची युद्धपातळीवर साफसफाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.