बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेकडून सोमवारी सकाळी मध्यवर्तीय बस स्थानकानजीक असलेल्या कीर्ती हॉटेलपासून नियाज हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करण्यात आली.
महापालिका आयुक्तपदी रुजू झाल्यापासून अशोक दूडगुंटी यांनी शहर स्वच्छतेसह सर्वांगीण विकासावर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने शहरातील अतिक्रमणे हटवून शहरातील रस्ते प्रशस्त व रहदारीस सुकर केले जात आहेत. महापालिकेच्या या अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत आज सकाळी नियाज हॉटेलपासून ते कीर्ती हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
गेल्या महिन्यात महापालिकेने हनुमान नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, सदाशिवनगर, विनायक मंदिर डबल रोड, फोर्ट रोड, काकती वेस रोड आदी ठिकाणी अतिक्रमणे हटवण्याची मोहीम राबविली होती. काही ठिकाणी महापालिका कर्मचारी आणि व्यापारात वादावादीही झाली होती. त्यानंतर मात्र गेल्या पंधरा दिवसापासून ही कारवाई बंद होती.
सोमवारी सकाळी मार्केट पोलीस ठाण्यासमोरील हॉटेल नियाज ते हॉटेल कीर्ती पर्यंत रस्त्यात अतिक्रमण करून उभारलेले फलक दुकानासमोरील अडथळे जम्स हटविण्यात आले. अतिक्रमण निर्मूलन पथकाने हे साहित्य जप्त केले असून पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. गेल्या दीड महिन्यात याच रस्त्यावर ही तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या पथकाने इतर ठिकाणीही झालेल्या अतिक्रमणांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी लोकांतून होत आहे.
सोमवारच्या मोहिमेअंतर्गत पानपट्टी व चहाच्या टपऱ्या, शेड वगैरे हटविण्याबरोबरच अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील अतिक्रमित बांधकामावर हातोडा चालवला. यावेळी रस्त्यावर अनधिकृतपणे केलेले बांधकाम हातोड्याने फोडून हटविण्यात आले. पोलीस संरक्षणात राबविण्यात आलेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमांमुळे सदर रस्त्यावरील दुकानदार व व्यवसायिकांच्या कपाळावर आठी आली होती दरम्यान या मोहीम अनेक ठिकाणी कारवाई करण्यात दरम्यान दूजाभाव केल्याचा देखील आरोप केला जात होता.