बेळगाव लाईव्ह: भक्तांच्या मनात देव हा सगळीकडे भरला आहे अशी भावना कायमचं राहते. भारतीय समाज मन तर प्रत्येक गोष्टीत देव शोधतो. फळ फुल पाणी माती झाडे डोंगर आकाश अग्नी प्रत्येक रुपात देवाचा आभास निर्माण होतो. त्याच अनुभूतीचा एक भाग म्हणजे अर्चना देशपांडे यांना दिसतो चॉकलेट मध्ये बाप्पा…
या अगोदर गणपती बाप्पा अनेक खाद्य पदार्थ, माती शाडू किंवा नारळ, खारीक बदाम सह बनवलेले आपण पाहिले आहे. भारतीय नोट करन्सी मधून देखील एका ठिकाणी बाप्पांची मूर्ती बनवण्यात आली आहे. बेळगावात आपल्या मुलीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आईने चॉकलेटने गणेश मूर्ती साकारली आहे.
बुधवार पेठ टिळकवाडी बेळगाव येथे राहणाऱ्या अर्चना देशपांडे या गृहिणीने गणेश चतुर्थीत चॉकलेट मधून गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे.
अर्चना यांच्या घरी गणपती आणत नाहीत मात्र त्यांची मुलगी निशिता हिच्या विनवणी वर अर्चना यांनी स्वतःच घरात चॉकलेट मधून गणपतीची मूर्ती बनवली असून त्याची दररोज पूजा करत आहेत.
गणेश विसर्जना नंतर सदर मूर्ती दुधात घालून प्रसाद म्हणून निशीता आणि तिच्या मैत्रिणींनी वाटण्यात येणार आहे असे अर्चना यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले.
सृष्टीला देव मानने हा श्रध्देचा जसा भाग आहे तसा संस्कृतीचाही भाग आहे. भारतीय समाजात प्रत्येक गोष्टीत देव सामावला आहे अशी भावना असल्याने प्रत्येक बाब पूजनीय ठरते त्यामुळे अर्चना देशपांडे यांचा चॉकलेट बाप्पा हा देखील त्यांच्या अपूर्व श्रध्देचा अनोखा आविष्कार आहे.
चॉकलेट हा लहान मुलांना आवडणारा खाद्य पदार्थ तसचं गणपती बाप्पा लहान मुलांच्या आवडीचा देव.. आपल्या मुलीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आईने चक्क चॉकलेट बाप्पा साकारला हे देखील विशेष आहे.