चोरी आणि वाटमारी प्रकरणी बेनचनमर्डी कुख्यात खिलारी गॅंग आणि गोकाक एस. पी. सरकार गॅंग मधील 9 जणांना गोकाक पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून जवळपास 8 लाख रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यांसह चोरीचा इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबतची माहिती अशी की, गुरुनाथ विरूपाक्ष बडीगर हे गेल्या 14 सप्टेंबर रोजी गोकाकहून कनसगिरीला जात असताना अज्ञातांनी वाटमारी करून त्यांची मोटरसायकल गळ्यातील सोन्याची चैन आणि पैसे लांबवले होते या प्रकरणी बडीगर यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती.
या तक्रारीच्या आधारे गोकाक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांच्या आदेशावरून गोकाकचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ आर. राठोड यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.
या पथकाने अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख एम. वेणूगोपाल आणि गोकाकचे उपपोलीस प्रमुख डी. एच. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली काल सोमवारी 18 सप्टेंबर रोजी बेनचनमर्डी कुख्यात खिलारी गॅंग आणि गोकाक एस. पी. सरकार गॅंग मधील 9 जणांच्या मुसक्या आवळल्या.
तसेच त्यांच्याकडील चोरी, वाटमारी, मोटरसायकल चोरी, जनावरांची चोरी याद्वारे जमलेले 7 लाख 89 हजार 700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, 19 मोबाईल संच, 16 मोटरसायकली, एक अशोक लेलँड ट्रक आणि 4 जंबी -तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.